Video: "Don't bother threatening us"; BJP MLA Atul Bhatkhalkar warns CM Uddhav Thackeray | Video: “आम्हाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका”; भाजपा आमदाराचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

Video: “आम्हाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका”; भाजपा आमदाराचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

ठळक मुद्देराज्याच्या सुव्यवस्थेकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं, कोरोनाच्या संकटावर मात करावीदात पाडू, बघून घेऊ ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का?त्यांच्या धमक्यांना घाबरेल या भ्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राहू नये

मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वर्षपुर्ती होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत, याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विशेष मुलाखत दिलेली आहे, या मुलाखतीचा प्रोमो सोशल मीडियात सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्ध केला आहे, यात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सज्जड दम देताना दिसत आहे, मात्र यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

याबाबत आमदार अतुल भातखळकर यांनी व्हिडीओ पोस्ट करून म्हटलंय की, मुख्यमंत्र्यांची उद्याच्या सामनात मुलाखत प्रसिद्ध होईल, त्यातील प्रोमोमधील भाषा ही केवळ दुदैवी नसून महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारी आहे, राज्याचे मुख्यमंत्री दात पाडणे, सुडाचं राजकारण करणे, धमक्या देण्याची भाषा करतात हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेच्या विरोधातलं आहे, मुख्यमंत्री आहेत की एखाद्या गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख म्हणून ते बोलतायेत असा प्रश्न पडतो असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

तसेच बायका, मुलं आम्हाला पण आहे, म्हणून आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरतो आणि त्यांच्या धमक्यांना घाबरेल या भ्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राहू नये, राज्याच्या सुव्यवस्थेकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं, कोरोनाच्या संकटावर मात करावी, दात पाडू, बघून घेऊ ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का? भाजपाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये असा इशारा भाजपाचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

महाविकास आघाडीला वर्ष पूर्ण होत आहे. ही मुलाखत उद्या प्रसिद्ध होणार आहे. या अभिनंदन मुलाखतीचा प्रोमो पोस्ट करताना राऊत यांनी उद्या धमाका असे कॅप्शन दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे देखील काही प्रश्नांवर बिचकल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे. ४४ सेकंदांचा हा प्रोमो आहे.

मुलाखतीच्या प्रोमोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारावजा उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ''ठीक आहे, हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे जाईन'' हे असे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका, कारण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. कोणी कितीही आडवे आले त्या आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल, असा इशारा दिला आहे.

 

Web Title: Video: "Don't bother threatening us"; BJP MLA Atul Bhatkhalkar warns CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.