महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही- गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 10:41 AM2020-11-30T10:41:51+5:302020-11-30T10:43:30+5:30

नितीन गडकरींची राज्य सरकारवर जोरदार टीका; फडणवीस यांच्याकडूनही सरकारचा समाचार

union minister nitin gadkari slams cm uddhav thackeray led state government | महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही- गडकरी

महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही- गडकरी

Next

नागपूर: महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. त्याशिवाय ते पुढेच नाही, अशी टोला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लगावला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासकामांना विलंब होत असल्याचं गडकरी म्हणाले. 'नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात आली. मात्र सरकार बदललं आणि काम ठप्प झालं. नागपूर ब्रॉड गेज मेट्रोला मंजुरी देण्यासाठी या सरकारला एक वर्ष लागलं. भाजपचं सरकार असतं तर एक महिन्यात झालं असतं,' असं गडकरींनी म्हटलं. निवडणुकीत जातीपातीचं राडकारण व्हायला नको, असं मत त्यांनी व्यक्त केलं. 'माणूस जातीनं मोठा होत नसतो, तर कर्तृत्वाने मोठा असतो. निवडणूक आली की अमक्या जातीचा आहे म्हणून उमेदवारी मागितली जाते. विविध पक्षांमध्ये जातीनिहाय आघाड्या आहेत. त्या बंद झाल्या पाहिजे. कार्यकर्त्यांत जात नसते. मात्र ज्यांना उमेदवारी पाहिजे असते, त्यांना जात आठवते. परंतु राज्यातील आघाडी सरकार व केंद्रातील विरोधक जातीचं राजकारण करत आहेत. त्यांना धडा शिकवायला हवा,' असं गडकरी म्हणाले.

विश्वासघात करत राज्यात तीन पक्षांचे सरकार आलं. पण आज सरकारमधील एकही मंत्री वर्षभरातलं आपलं काम सांगू शकलेला नाही, अशी टीका यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. शेतकऱ्यांना दिलेलं वचन लक्षात नाही. मात्र मुख्यमंत्रिपदाचं वचन त्यांच्या बरोबर लक्षात आहे. हे सरकार आहे की तमाशा?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. ओबीसी मुलांना जगात चांगल्या ठिकाणी शिकता यावं यासाठी योजना आणली. मात्र हे सरकार काय करतंय माहीत नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं. मात्र या सरकारमधील मंत्री वेगवेगळ्या भूमिका मांडून नवे वाद निर्माण करतात, असंही फडणवीस पुढे म्हणाले. 
 

Web Title: union minister nitin gadkari slams cm uddhav thackeray led state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.