Then Eknath Khadse would have become the CM; Union Minister BJP Raosaheb Danve statement | ...तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

...तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

ठळक मुद्देमी समजावलं नाही पण राजकारणावर प्रदीर्घ चर्चा झाली. जे चाललंय त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. नाथाभाऊसोबत एकही आमदार, पदाधिकारी जाणार नाही याची खात्री आहे. कारण ते विचारधारेशी जोडलेले आहे.खडसेंना प्रदेशाध्यक्षपदापेक्षा मंत्रिपदात जास्त रस होता. परिस्थिती सुधारणार नाही असं वाटत असल्याने राजीनामा दिला

मुंबई – एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने काहीही फरक पडणार नाही, नाथाभाऊसोबत एकही आमदार, पदाधिकारी जाणार नाही असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केला आहे. त्याचसोबत एकनाथ खडसेंचा वापर राज्याच्या भल्यासाठी करावा, विरोधकांसाठी करू नये असा टोला दानवेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, एकनाथ खडसेंना प्रदेशाध्यक्ष पद देऊनही त्यांनी नाकारलं, त्यामुळे देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले. जर एकनाथ खडसे प्रदेशाध्यक्ष असते तर कदाचित खडसे मुख्यमंत्री असते. खडसेंना प्रदेशाध्यक्षपदापेक्षा मंत्रिपदात जास्त रस होता. परिस्थिती सुधारणार नाही असं वाटत असल्याने खडसेंनी राजीनामा दिला असावा. नाथाभाऊ आमचे नेते होते, त्यांनी पक्ष सोडला दु:ख आहे. परंतु पक्ष एका माणसावर आधारित नसतो, कार्यकर्ते गावागावात आहेत, नाथाभाऊसोबत एकही आमदार, पदाधिकारी जाणार नाही याची खात्री आहे. कारण ते विचारधारेशी जोडलेले आहे. उत्तर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. म्हणून चिंता नाही, एकनाथ खडसे आता भाजपासाठी विषय संपलेला आहे असं त्यांनी सांगितले.

बिहारमध्ये एकनाथ खडसेंचा मुद्दा गाजणार; विरोधक भाजपाला कोंडीत पकडणार

तसेच मी नाथाभाऊच्या फार्महाऊसवर, घरी गेलो, सरकारी बंगल्यावर गेलो होतो, मी समजावलं नाही पण राजकारणावर प्रदीर्घ चर्चा झाली. जे चाललंय त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. हिना गावित, सुभाष भामरे, रक्षा खडसे असे अनेक नेते आहेत. भाजपाने २०१९ मध्ये राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचवलं त्यामुळे खडसेंना प्रवेश देऊन हे नुकसान भरुन काढता येतंय का? यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केला, पण एकनाथ खडसेंच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही, नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करावा, विरोधकांसाठी नव्हे असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

एकनाथ खडसेंचा २ ओळींचा राजीनामा पण शुद्धलेखनाच्या अनेक चुका; सोशल मीडियात ट्रोल

एकनाथ खडसेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल. एकनाथ खडसेंसोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. तुर्तास एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे या भाजपातच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे

एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास कसा होता?

१९८० मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, १९८७ मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. १९८९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (१९८९ – २०१९) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.

१९९५ ते १९९९ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये खडसेंनी अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती. खडसेंनी नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोबर २०१४ या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे. (Eknath Khadse Political Career)

२०१४ मध्ये एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते. पण अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धुरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून ३ जून २०१६ रोजी एकनाथ खडसेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी १९८७ मतांनी त्यांचा पराभव केला.

विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी

एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आकडेवारी, पुराव्यांसह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत होते. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग साडे आठ तास भाषण करून विक्रम नोंदवला. याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान केला.

Web Title: Then Eknath Khadse would have become the CM; Union Minister BJP Raosaheb Danve statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.