"भाजपा सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन बंगालमध्ये आली पण यांचा 'नवरा' कोण आहे?" 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 01:48 PM2021-03-02T13:48:32+5:302021-03-02T13:54:33+5:30

Tejashwi Yadav And BJP : राजकीय पक्षांकडून सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.

tejashwi yadav lashed out at bjp over west bengal assembly election | "भाजपा सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन बंगालमध्ये आली पण यांचा 'नवरा' कोण आहे?" 

"भाजपा सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन बंगालमध्ये आली पण यांचा 'नवरा' कोण आहे?" 

googlenewsNext

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. याच दरम्यान घोषवाक्य आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर हल्लाबोल केला जात आहे. याच दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंगाल दौऱ्यावर असलेल्या तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी भाजपावर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेता तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. 

"भाजपा सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन बंगालमध्ये आली पण यांचा 'नवरा' कोण आहे?" असं म्हणत तेजस्वी यादव यांनी टीकास्त्र सोडलं आहे. "भाजपा इतका मोठा पक्ष आहे, पण सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन भाजपा बंगालमध्ये आली आहे. मात्र बोहल्यावर बसणारा नवरा कोण आहे? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या एकातरी नेत्याचं नाव सांगून दाखवा. ज्यांना विधानसभेचा अनुभवच नाही तुम्ही त्यांच्याकडे सत्ता सोपवणार का?" असा सवाल विचारला आहे. 

तेजस्वी यादव यांनी "आम्ही हरलो नाही तर आम्हाला हरवण्यात आलं, बिहारचं सध्याचं सरकार चोर दरवाज्यातून आलं आहे, बिहारची जनता ही बाब खूप चांगली समजते" असं बिहार निवडणुकांबाबत बोलताना म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचा (BJP) नेमका चेहरा कोण असणार? याची घोषणा करा असं टीएमसीकडून वारंवार म्हटलं जात आहे. यासोबतच टीएमसीने (TMC) भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. "बंगाल को अपनी बेटी चाहिए" असं म्हणत निशाणा साधला आहे. मात्र आता भाजपाने या वाक्याला जोरदार प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. 

टीएमसीवर हल्लाबोल करताना भाजपाने बंगाल भाजपामधील नऊ महिला नेत्यांचे फोटो ट्वीटरवरुन शेअर केले आहेत. सोबतच बंगालला आपली मुलगी हवी आहे, आत्या नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee)  सणसणीत टोला लगावला आहे. भाजपाने आपल्या पोस्टरमध्ये ममता यांना आत्या म्हटलं आहे. बंगाल निवडणुकीच्या अभियानाच्या सुरुवातीलाच टीएमसीने बंगालला आपली मुलगी हवी असल्याची घोषणा दिली होती. टीएमसी दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांना बाहेरचे असल्याचं म्हणलं आहे. 

"बंगाल को अपनी बेटी चाहिए, बुआ नहीं", 'ते' पोस्टर ट्विट करत भाजपाचा ममता बॅनर्जींना सणसणीत टोला

तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी राज्यातील लोकांना आपली मुलगी पाहिजे, जी गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्याच्या रुपात त्यांच्यासोबत आहेत. आम्हाला बंगालमध्ये बाहेरच्या कोणाला आणायचं नाही असं म्हटलं होतं. भाजपाने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये भाजप नेत्या देबोश्री चौधरी, लॉकेट चटर्जी, रूपा गांगुली, भारती घोष आणि अग्निमित्रा पॉल यांच्यासह काही महिला नेत्यांचे फोटो शेअर केले आहेत. भाजपाने या महिला नेत्यांना बंगालची मुलगी म्हटलं आहे.

Web Title: tejashwi yadav lashed out at bjp over west bengal assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.