so I avoid going out of the house; MNS president Raj Thackeray revealed | ...म्हणून मी घराबाहेर जाणं टाळतो; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला खुलासा

...म्हणून मी घराबाहेर जाणं टाळतो; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला खुलासा

ठळक मुद्देज्या कंपन्यांमध्ये रिक्त जागा आहेत त्याठिकाणी मराठी मुलांना नोकरी देण्यासाठी प्रयत्न करावेतसरकारने लोकांना दहशतीतून बाहेर काढणे गरजेचे आहे, मानसिकदृष्ट्या लोक खचत आहेतकेंद्र राज्याकडे बोट दाखवतं तर राज्य केंद्राकडे बोट दाखवतं

मुंबई – सध्या राज्यात कोरोनाचा काळ आहे, अशावेळी गर्दी करणे, लोकांना एकत्र करणं योग्य नाही, मी बाहेर पडलो, लोकं जमा होतील, म्हणून जास्तीत जास्त काळजी घेतो, जे शासकीय पदावर आहेत त्यांनी बाहेर पडणे गरजेचे आहेच, कारण त्यांना शासकीय अधिकाऱ्यांशी बोलायचं असतं, मी गेलो तर फक्त आमचे कार्यकर्ते येणार, लोकं गोळा होणार म्हणून मी बाहेर जाणं टाळतो असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

एबीपी माझाशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोरोना काळात काळजी घेणं गरजेचे, पण घाबरुन घरात राहणं योग्य नाही, अनेक जण कोरोनातून बरे झाले आहेत, सरकारने लोकांना कोरोनाच्या दहशतीतून बाहेर काढणे गरजेचे आहे, मानसिकदृष्ट्या लोक खचत आहेत, त्यामुळे सरकारने हळूहळू सगळ्या गोष्टी सुरु कराव्यात, लोकांना कोरोना दहशतीच्या परिस्थितीतून बाहेर काढावं. इंग्लंडला सगळ्या गोष्टी उघडल्या आहेत, काळजी घ्यायला हवी पण लॉकडाऊन करुन हे साध्य होणार नाही असं सांगत त्यांनी लॉकडाऊन हटवण्याची मागणी केली.

तसेच बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांची नोंदणी सरकारनं करणे गरजेचे आहे, मनसेच्या प्रतिनिधींनी अनेक कंपन्यांशी संवाद साधला. सरकारला या गोष्टी निदर्शनास आणूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकारने ज्या गोष्टी करायला हव्यात त्याबद्दल कोणीही प्रश्न विचारत नाही. ज्या कंपन्यांमध्ये रिक्त जागा आहेत त्याठिकाणी मराठी मुलांना नोकरी देण्यासाठी प्रयत्न करावेत, पक्ष म्हणून माझ्या पद्धतीने आम्ही हे काम सुरु आहे, पण सरकारनेही काही योजना करायला हव्यात असंही राज ठाकरेंनी सांगितले.

त्याचसोबत मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जे काम गेल्या ४ महिन्यात केले आहे, औषधे, मास्क, जेवणाचे डब्बे सगळं काही पुरवण्यात मनसेचे कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत, अनेक जणांना मी फोन करुन स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्या असं सूचना करत असतो, मध्यंतरी एका औषधासंदर्भात मी राजेश टोपेंशी बोललो तर त्यांनी सांगितले ते मागवता येत नाही, केंद्राने तसे निर्देश दिले आहेत, केंद्र राज्याकडे बोट दाखवतं तर राज्य केंद्राकडे बोट दाखवतं, तुम्ही जास्त काळ लॉकडाऊनमध्ये लोकांना ठेवता येणार नाही असंही राज ठाकरे म्हणाले.

Web Title: so I avoid going out of the house; MNS president Raj Thackeray revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.