“रावसाहेब दानवेंची हकालपट्टी करा”; ‘त्या’ विधानावरुन शिवसेनेची PM मोदींकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 23:01 IST2021-08-22T22:59:31+5:302021-08-22T23:01:59+5:30
भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेनेने रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

“रावसाहेब दानवेंची हकालपट्टी करा”; ‘त्या’ विधानावरुन शिवसेनेची PM मोदींकडे मागणी
रत्नागिरी: भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेवरून महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. विशेष करून नारायण राणे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसून, शिवसेनेकडूनही नारायण राणे आणि भाजपला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यातच भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेनेने रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. (shiv sena vinayak raut comment on raosaheb danve statement over rahul gandhi)
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी हे काही कामाचे नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे, बैलांसारखे राबत असल्याचे विधान केले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना उदाहरण देत असल्याचे सांगितले होते. दानवेंच्या या विधानानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले असून, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
“महाराष्ट्रात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही”; केंद्रीय मंत्र्यांचा दावा
भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आलीय
भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे. त्यातून त्यांची विकृती दिसून येते. दानवेंची बुद्धी भ्रष्ट झाली असून, त्यांच्या विधानाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, या शब्दांत विनायक राऊत यांनी टीका केली आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरी, सिंधुदुर्गात जाणार असल्याबाबत विनायक राऊत यांना विचारले असता, त्याचा कोणताही परिणाम शिवसेनेवर होणार नाही. नारायण राणे यांच्या शक्ती प्रदर्शनाला काहीही अर्थ नाही. उलट राणे कोकणात तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहेत. अशा रितीने आशीर्वाद यात्रा काढून कोकणात शिवसेनेला कोणताही फटका बसणार नाही. कोकणात कालदेखील शिवसेना होती. आजही आहे. तसेच ती उद्या देखील राहणार असून, नारायण राणेंच्या यात्रेला गंभीरपणे घेण्याचे कारण नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.
“आता सामनाचे नाव बदलावे आणि पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करावे”; भाजपची टीका
दरम्यान, बाडगा हा नेहमी कोडगा असतो. राणेंकडून मंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केली जात आहे. सत्तेसाठी द्रोह करणे हा नारायण राणेंचा स्थायीभाव आहे. राणेंनी सत्तेसाठी लाचार होत द्रोह केला असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे खंबीर खांब असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे नाराज असून, त्यांना प्रत्येक फाईलवर सही करण्यासाठी 'मातोश्री'ची परवानही घ्यावी लागते. भाजपमध्ये आल्यास त्याचे स्वागत असल्याचे नारायण राणे यांनी वसई-विरार येथील जनआशीर्वाद यात्रेवेळी म्हटले होते.