shiv sena mp sanjay raut slams governor bhagat singh koshyari over 12 proposed mlcs | ...अन् बोलता बोलता संजय राऊत त्यांना उंदिर म्हणून गेले; भाजपकडून प्रत्युत्तर मिळणार?

...अन् बोलता बोलता संजय राऊत त्यांना उंदिर म्हणून गेले; भाजपकडून प्रत्युत्तर मिळणार?

मुंबई: भारतीय जनता पक्षाची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये मोदी सरकार राज्यपालांच्या माध्यमातून आडकाठी करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी कालच पत्रातून केला. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना यांच्यासह देशातल्या अनेक नेत्यांना पत्र लिहिलं. हाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना लक्ष्य केलं. (shiv sena mp sanjay raut slams governor bhagat singh koshyari over 12 proposed mlcs)

तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? संजय राऊत यांचं रोखठोक उत्तर; म्हणाले...

महाविकास आघाडी सरकारनं राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या सदस्यांची यादी कोश्यारी यांना कधीच सोपवली आहे. पण अद्याप त्या यादीला राज्यपालांना मंजुरी दिलेली नाही. राज्यपालांनी त्या १२ सदस्यांचं जवळपास एक वर्ष खाल्लं. या सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. पण त्यांचं १ वर्ष राज्यपालांमुळे वाया गेलं. हे १२ सदस्य ठरलेल्या वेळेनुसार, त्यांचा कार्यकाळ संपल्यावर निवृत्त होतील. पण त्यांची नियुक्ती वेळेवर झालेली नाही, असं राऊत म्हणाले.

बारा सदस्यांची यादी राज्यपाल मांडीखाली दाबून बसले आहेत. त्यांचं एक वर्ष राज्यपालांनी खाल्लं आहे. अजून किती खाणार आहात? अजून किती कुरतडणार आहात उंदरासारखं? पण तुम्ही हे लक्षात ठेवा, तुम्ही घटना, संविधान कुरतडत आहात. या घटनेचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली. सरकारनं दिलेल्या यादीला मंजुरी दिल्यास सरकारची ताकद आणखी वाढेल, असं त्यांना वाटत असेल. त्यामुळेच ते यादीला मंजुरी देत नसतील, असं राऊत पुढे म्हणाले.

"भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल"

तीन महिन्यात राज्यात सत्ता परिवर्तन होईल, अशा प्रकारचं सूचक विधान अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी केलं होतं. त्यावर सरकार पडण्याच्या तारखा सरकार स्थापन झाल्यापासून दिल्या जात आहेत. दीड वर्ष असंच गेलं. तीन महिने कशाला थांबता, तीन दिवसांत सरकार पाडा, असं आव्हान राऊत यांनी दिलं. बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जींना यश मिळेल. तृणमूल काँग्रेस सत्ता राखेल. त्या निवडणुकीनंतरही महाराष्ट्रात काही होणार नाही. वेळेला ४ आमदार मिळत नाहीत. भाजप तर बहुमताच्या आकड्यापासून ३९ नं दूर आहे, असं राऊत म्हणाले.

Web Title: shiv sena mp sanjay raut slams governor bhagat singh koshyari over 12 proposed mlcs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.