“Shiv Sena ministers Shamburaj Desai Reaction on Prakash Ambedkar Statement on Udayanraje Bhosale | “प्रकाश आंबेडकरांविरोधात शिवसेना मंत्र्यांचा संताप; सातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही”

“प्रकाश आंबेडकरांविरोधात शिवसेना मंत्र्यांचा संताप; सातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही”

ठळक मुद्देआरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकरांनी भूमिका मांडावी, मराठा समाज ठामपणे भूमिका मांडून सरकारकडे पाठपुरावा करत आहे.छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर जी टीका केली ती निंदणीय आहे, त्यांची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे. २०१४ मध्ये खासदार उदयनराजेंवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून आम्ही विधिमंडळाचं सभागृह कामकाज बंद पाडलं होतं

सातारा – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली, ‘एक राजा बिनडोक’ अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी नाव न घेता उदयनराजेंवर प्रहार केला. त्यावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा निषेध करत शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांना इशारा दिला आहे.

याबाबत शंभुराज देसाई म्हणाले की, छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर जी टीका केली ती निंदणीय आहे, त्यांची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे. छत्रपती घराणं, त्यांच्या गादीला महाराष्ट्रातील जनता वंदन करत असते. दोन्हीही छत्रपतींनी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. असं असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनी छत्रपतींच्या वंशजांवर अशाप्रकारे टीका करणे हे गैर आहे, चुकीचं आहे, आम्ही सातारकर, छत्रपतींचे मावळे म्हणून ही टीका अजिबात सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

तसेच आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकरांनी भूमिका मांडावी, मराठा समाज ठामपणे भूमिका मांडून सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला दोन्ही राजेंनी त्यांची भूमिका सरकारकडे ठेवली आहे. सातारच्या गादीचा अवमान कधीही सहन करणार नाही, २०१४ मध्ये खासदार उदयनराजेंवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून आम्ही विधिमंडळाचं सभागृह कामकाज बंद पाडलं होतं, त्यामुळे सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील जनता, छत्रपती घराण्याचे प्रेमी त्यांच्या छत्रपतींच्या वारसावर केलेली टीका सहन करणार नाही असं शंभुराज देसाईंनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर बोचरी टीका; “एक राजा बिनडोक तर दुसरा राजा…”

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?   

दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे असं कुठेही वाटलं नाही, एक राजा बिनडोक आहे, तर दुसरे संभाजीराजे त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे परंतु ते आरक्षणसोडून इतर मुद्द्यावर भर देतायेत. घटना कळत नसताना भाजपानं राज्यसभेवर पाठवलं कसं? हा प्रश्न उपस्थित होतो, संभाजीराजे आरक्षण सोडून इतर मुद्द्यावर जास्त भर देतात अशा शेलक्या शब्दात प्रकाश आंबेडकरांनी संभाजीराजे आणि नाव न घेता उदयनराजेंवर टीका केली आहे.

 ...तर महाराष्ट्रात यादवी माजली असती.

अनेक मराठा समाजाचे कार्यकर्ते चांगले आहेत, महाराष्ट्र घडवलेला असे राज्यकर्ते आहेत, नेतृत्वाचा विषय त्यांचा आहे. आरक्षणाचा मुद्दा विचलित करण्याचा प्रयत्न काही जणांचा आहे, ज्यांना घटना माहिती नाही, त्यांनी बोलू नये, आरक्षण हे घटनेने दिले आहेत, ज्यांना आरक्षण दिलंय त्यांच्याशी उघड भांडण करायचं आहे का? मराठा समाजाचे मोर्चे निघाले तसे ओबीसी समाजाचे निघाले होते, तेव्हा मी शांत राहण्याचं आवाहन केलं अन्यथा महाराष्ट्रात यादवी निर्माण झालं असतं, त्यामुळे शांत असलेल्या वातावरणाला पेटवण्याचं काम करू नये, स्वत:चं अस्तित्व राखण्यासाठी जातीचा वापर केला जातोय अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

 

Web Title: “Shiv Sena ministers Shamburaj Desai Reaction on Prakash Ambedkar Statement on Udayanraje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.