प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर बोचरी टीका; “एक राजा बिनडोक तर दुसरा राजा…”

By प्रविण मरगळे | Published: October 8, 2020 01:32 PM2020-10-08T13:32:21+5:302020-10-08T17:22:29+5:30

Maratha Reservation, Prakash Ambedkar, Yuvraj Chhatrapati Sambhajiraje, Udayanraje News: शांत असलेल्या वातावरणाला पेटवण्याचं काम करू नये, स्वत:चं अस्तित्व राखण्यासाठी जातीचा वापर केला जातोय अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली.

Prakash Ambedkar Target MP Sambhaji Raje & Udayanraje over Maratha Reservation | प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर बोचरी टीका; “एक राजा बिनडोक तर दुसरा राजा…”

प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर बोचरी टीका; “एक राजा बिनडोक तर दुसरा राजा…”

googlenewsNext
ठळक मुद्देज्यांना घटना माहिती नाही, त्यांनी बोलू नये, आरक्षण हे घटनेने दिले आहेतमराठा समाजाचे मोर्चे निघाले तसे ओबीसी समाजाचे निघाले होते, तेव्हा मी शांत राहण्याचं आवाहन केलं अन्यथा महाराष्ट्रात यादवी निर्माण झालं असती.एमपीएससी परीक्षा शासनाने म्हटलं म्हणजे होणार, आम्ही होऊ देणार नाही ही भूमिका घेणे योग्य नाही

पुणे – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा समाजात संताप व्यक्त होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीनंतर राज्यभरात मराठा समाजाची आंदोलनं, बैठका सुरु झाल्या आहेत. येत्या १० ऑक्टोबरला मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, मराठा समाजाच्या काही संघटना ज्या भूमिका घेतायेत ते मराठा समाजाच्या पायावर दगड मारणारी भूमिका घेतात असं सांगत त्यांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा न देणाऱ्या संघटनांवर टीका केली, तसेच एमपीएससी परीक्षा शासनाने म्हटलं म्हणजे होणार, आम्ही होऊ देणार नाही ही भूमिका घेणे योग्य नाही, सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून परीक्षा होऊद्या, आरक्षण घटनेच्या आधारे आहे की नाही हे सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे, ही कायदेशीर बाब आहे असं सांगत त्यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेला विरोध केला.

तसेच दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे असं कुठेही वाटलं नाही, एक राजा बिनडोक आहे, तर दुसरे संभाजीराजे त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे परंतु त्यांनी इतर मुद्द्यावर भर देतायेत. घटना कळत नसताना भाजपानं राज्यसभेवर पाठवलं कसं? हा प्रश्न उपस्थित होतो, संभाजीराजे आरक्षण सोडून इतर मुद्द्यावर जास्त भर देतात अशा शेलक्या शब्दात प्रकाश आंबेडकरांनी संभाजीराजे आणि नाव न घेता उदयनराजेंवर टीका केली आहे. तसेच मी कोणाला अंगावर घेण्याला घाबरत नाही असंही त्यांनी सांगितले. 

 ...तर महाराष्ट्रात यादवी माजली असती.

अनेक मराठा समाजाचे कार्यकर्ते चांगले आहेत, महाराष्ट्र घडवलेला असे राज्यकर्ते आहेत, नेतृत्वाचा विषय त्यांचा आहे. आरक्षणाचा मुद्दा विचलित करण्याचा प्रयत्न काही जणांचा आहे, ज्यांना घटना माहिती नाही, त्यांनी बोलू नये, आरक्षण हे घटनेने दिले आहेत, ज्यांना आरक्षण दिलंय त्यांच्याशी उघड भांडण करायचं आहे का? मराठा समाजाचे मोर्चे निघाले तसे ओबीसी समाजाचे निघाले होते, तेव्हा मी शांत राहण्याचं आवाहन केलं अन्यथा महाराष्ट्रात यादवी निर्माण झालं असतं, त्यामुळे शांत असलेल्या वातावरणाला पेटवण्याचं काम करू नये, स्वत:चं अस्तित्व राखण्यासाठी जातीचा वापर केला जातोय अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली.

छत्रपती संभाजीराजेंचा MPSC परीक्षेला विरोध

मराठा आरक्षणाच्याबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले असून, सरकारच्या हाती असलेल्या गोष्टीही राज्य सरकार करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच एमपीएससी परीक्षेबाबत राज्य सरकारने मराठा समाजाचं ऐकलं नाही तर मराठा समाज एमपीएससी केंद्र बंद पाडेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे अठरापगड जातींचं होतं. मात्र आज त्यातून मराठा समाज बाहेर का फेकला गेलाय? बहुजनांसाठी शाहू महाराजांनी आरक्षण दिले होते. मात्र आता मराठा समाज आरक्षणापासून वंचित का राहिलाय? असा सवाल करत संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली

 सर्व समाजाचे आरक्षण रद्द करा – उदयनराजे

सर्व समाजाचं आरक्षण रद्द करा आणि मेरिटनुसार आरक्षण द्या अशी मागणी उदयनराजेंनी केली होती. याबाबत उदयनराजे म्हणाले होते की, मराठा समाजातील तरुणांना चांगले मार्क्स मिळूनही प्रवेश मिळत नाही, तर दुसरीकडे कमी मार्क्स मिळूनही इतर समाजातील मुलांना प्रवेश मिळतात, प्रत्येकाला देवाने बुद्धी दिली आहे. मेरिटवर आरक्षण द्यावं, सगळेच आरक्षण रद्द करावं, ज्याने कष्टच घेतले नाही त्याला आरक्षणामुळे प्रवेश मिळतो आणि ज्याने कष्ट घेतले पण आरक्षण नाही म्हणून प्रवेश मिळत नाही, त्याचं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते, नैराश्य येते, काहीजण आत्महत्या करतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.

Web Title: Prakash Ambedkar Target MP Sambhaji Raje & Udayanraje over Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.