शरद पवार : जनमानसाची नाडी ओळखणारा नेता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 05:58 PM2020-12-12T17:58:41+5:302020-12-12T18:00:00+5:30

Sharad Pawar Birthday : शरद पवार हे एक लोकनेते आहेत. त्यांना जनमानसाची नाडी अचूक माहीत आहे. २००४ मध्ये जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सत्तेत आले त्या वेळी मला त्यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले.

Sharad Pawar: A leader who knows the pulse of the people | शरद पवार : जनमानसाची नाडी ओळखणारा नेता

शरद पवार : जनमानसाची नाडी ओळखणारा नेता

Next

- डॉ. मनमोहन सिंग
(माजी पंतप्रधान) 

माझे सन्माननीय मित्र आणि सहकारी शरद पवार वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत, याचा मला आनंद होत आहे. पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘लोकमत’ माध्यमसमूह विशेष पुरवणी प्रकाशित करीत आहे, हे समजल्यानंतर हा आनंद द्विगुणित झाला. शरद पवार हे एक लोकनेते आहेत. त्यांना जनमानसाची नाडी अचूक माहीत आहे. २००४ मध्ये जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सत्तेत आले त्या वेळी मला त्यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले. आमच्या मंत्रिमंडळात ते कृषिमंत्री होते. त्यामुळे शेतीविषयक त्यांना असलेले ज्ञान आणि शेतकऱ्यांविषयीचा कळवळा मला जवळून पाहता आला. कृषिमंत्री म्हणून पवार यांनी शेतीविकासासाठी अथक प्रयत्न केले. परिणामी, २००४ ते २०१४ या कालावधीत शेती क्षेत्रात उत्तम काम झाले. आपण केवळ अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णच झालो नाही, तर अन्नधान्याचे अतिरिक्त उत्पादन देशात झाले आणि त्याची निर्यात आपण इतर देशांना करू शकलो. शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले.

सामाजिक सुधारणांच्या बाबतीतही ते अग्रेसर आहेत. आपल्या देशाच्या लोकसंख्येत निम्मा वाटा असलेल्या महिलांचा विकास कसा होईल, याचा ते सातत्याने विचार करीत असतात. विकासाच्या प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले नाहीक, तर भारताचा सर्वांगीण विकास होणे कठीण आहे, असे त्यांचे ठाम मत आहे. पवार हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी चार वेळा निवडून आले. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने शेती आणि उद्योगक्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली. या क्षेत्रात आजघडीला जे विकासाचे चित्र दिसते त्यात पवारांचे योगदान मोठे आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही देशाला अजून बराच पल्ला गाठायचा असून त्या दिशेने आपण कायम प्रयत्नशील असायला हवे, असे त्यांचे मत आहे. सामाजिक न्याय आणि समानता या दोन मूल्यांवर त्यांची अतूट निष्ठा आहे.

यूपीए सरकारच्या कारकिर्दीत सर्व घटकपक्षांशी समन्वय साधण्याची कामगिरी शरद पवार यांनी लीलया पार पाडली. तत्पूर्वी संरक्षणमंत्री म्हणून काम करताना पवारसाहेबांनी तीनही सेनादलांचे सशक्तीकरण केेले. अशा या लोकनेत्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि सार्वजनिक जीवनात वावरण्यासाठी ईश्वर त्यांना निरोगी आयुष्य देवो, ही प्रार्थना. 

मानाचे स्थान 
५० हून अधिक वर्षांपासून ते राजकारणात आहेत. त्यांनी भूषविलेल्या प्रत्येक पदावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणात त्यांना मानाचे स्थान आहे ते केवळ त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर. 
 

Web Title: Sharad Pawar: A leader who knows the pulse of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.