शरद पवार सतर्क; काँग्रेसमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी विश्वासू शिलेदारावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 01:22 AM2020-08-27T01:22:40+5:302020-08-27T07:05:53+5:30

महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या भवितव्याची चिंता

Sharad Pawar alert; Praful Patel is responsible for keeping an eye on the developments in Congress | शरद पवार सतर्क; काँग्रेसमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी विश्वासू शिलेदारावर

शरद पवार सतर्क; काँग्रेसमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी विश्वासू शिलेदारावर

Next

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत समस्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे चिंताग्रस्त आहेत. काँग्रेस हा विरोधी पक्षांतील महत्त्वाचा दुवा असून तो दुर्बळ होऊ नये म्हणून त्या पक्षातील स्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याची कामगिरी पवार यांनी आपले विश्वासू सहकारी व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपविली आहे. काँग्रेसमधील घडामोडींची खडान्खडा माहिती त्वरित द्यावी, असेही पवार यांनी पटेल यांना सांगितले आहे.

काँग्रेस पक्ष आणखी क्षीण झाला तर त्याचा परिणाम देशातील ज्या राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे आहेत, त्यांच्यावर होण्याची शक्यता आहे. तो धोका वेळीच ओळखून शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे खास जबाबदारी दिली आहे. त्यामुळेच पटेल हे मंगळवारी तातडीने मुंबईहून दिल्लीत परतले व आता दिल्लीतच तळ ठोकून आहेत.

काँग्रेसमध्ये संघटनात्मक खूप महत्त्वाचे बदल व्हायला हवेत, अशी मागणी करणारे एक पत्र त्या पक्षाच्या २३ महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची कार्यकारिणीची सोमवारी बैठक झाली होती. काँग्रेसमधील या घडामोडींबद्दल विचारलेल्या प्रश्नावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकमत‘ला सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये आम्ही हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नाही. मात्र, महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे अशा घडामोडींचा होणारा परिणाम लक्षात घेता सतर्क राहणे आवश्यक असते.

काँग्रेसच्या काही नेत्यांशी बोलणे झाले आहे का, असे विचारता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल त्यांनी स्मितहास्य करून उत्तर दिले की, आम्ही दररोज परस्परांशी संवाद साधत असतो. काँग्रेस ही अधिक सबळ बनावी अशी आमची इच्छा आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रामध्ये केलेला आघाडी सरकारचा प्रयोग राष्ट्रीय स्तरावरही करणे शक्य होईल. काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींबद्दल कोणतेही भाष्य करण्यास प्रफुल्ल पटेल यांनी नकार दिला. वित्तविषयक संसदीय स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आलो होतो, असेही प्रफुल्ल पटेल यांनी आवर्जून सांगितले.

...तर पवारांचे मत खरे ठरेल

१९९९ साली काँग्रेस पक्षात जशी फूट पडली होती, तशीच स्थिती पुन्हा उद्भवल्यास ती नामी संधी असेल असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावर्षी शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. काही काँग्रेस नेते रोज खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा करीत आहेत. राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्यास पात्र नाहीत हे मत शरद पवार आधीपासून मांडत आले आहेत. काँग्रेसमध्ये तशा घडामोडी घडल्या तर पवारांचे मत खरे ठरेल असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींबाबत प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना इत्थंभूत माहिती दिली आहे, असे कळते.

Web Title: Sharad Pawar alert; Praful Patel is responsible for keeping an eye on the developments in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.