'ओबीसी जनगणनेच्या मागणीमुळे प्रीतम मुंडेंना मंत्रिपद दिलं नसावं...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 13:21 IST2021-07-09T13:17:01+5:302021-07-09T13:21:09+5:30
Sachin Kharat on Pritam Munde and cabinet expansion: आता ओबीसी समाजासाठी निर्णय घ्या, सचिन खरात यांची मागणी

'ओबीसी जनगणनेच्या मागणीमुळे प्रीतम मुंडेंना मंत्रिपद दिलं नसावं...'
मुंबई: नुकतचं नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळापासून वंचित ठेवण्यात आले. त्यांच्या जागी राज्यसभा खासदार भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आले. यामुळे मुंडे समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ओबीसी समाजाची जनगणना करण्याची मागणी केल्यामुळे मंत्रिपद दिलं नसावं, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी व्यक्त केले आहे.
सचिन खरात यांनी पंकजा मुंडेंना आता निर्णय घेण्याची विनंती केली आहे. याबाबत ते म्हणाले की, 'पंकजाताई, आपण ज्या भारतीय जनता पक्षात काम करत आहात, त्याच भाजपने मंडल आयोगाला विरोध केला होता. दिवंगत गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजाचे मोठे नेते होते. मुंडे साहेब सतत ओबीसी समाजाचे प्रश्न संसदेत मांडायचे, याची आठवण आपण भाजपला करुन दिली. 24 जानेवारीला केंद्र सरकारकडे मागणी केलीत, की आम्हीही देशाचे आहोत, ओबीसी समाजाची जनगणना करा. ही मागणी केल्यामुळे आपल्याला मंत्रिपद दिले नाही, असे दिसत आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजासाठी निर्णय घ्या!' अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.
'मुंडे भगिनींची बदनामी करू नका'
काल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन मुंडे भगिनींच्या नाराजीवर भाष्य केले. 'मुंडे भगिनी नाराज असल्याचे तुम्हाला कुणी सांगितले? उगाच काहीही बदनामी करू नका. भाजपामध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतो. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचे सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका,' असे ते म्हणाले.