Pooja Chavan Death Case: मोठी बातमी! अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 15:33 IST2021-02-28T15:23:58+5:302021-02-28T15:33:30+5:30
Pooja Chavan Death Case: संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला राजीनामा; विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी राजीनामा सुपूर्द

Pooja Chavan Death Case: मोठी बातमी! अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा
मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. राठोड यांनी राजीनामा न दिल्यास विधिमंडळ अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षानं दिला होता. (shiv sena minister sanjay rathod resigns as minister)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचं बोललं जात होतं. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवल्यानं शिवसेनेनं राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितलं. अखेर आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. आता याबद्दल मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच माध्यमांशी बोलताना राठोड यांच्या राजीनाम्याबद्दलचे संकेत दिले होते. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याप्रकरणी काही डोळे मिटून बसलेले नाही. ते लक्षपूर्वकपणे यावर निर्णय घेतील,' असं सूचक विधान राऊत यांनी केलं होतं. यानंतर आज सकाळी राऊत यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण करून दिली होती.
भाजपचा आक्रमक पवित्रा
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी संजय राठोड यांचा राजीनामा घ्या, नाहीतर अधिवेशन होऊ देणार नाही. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूजा चव्हाण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला. यासोबतच संपूर्ण राज्यभर भाजपकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनं करण्यात आली.