मराठी कलाकारांची राजकीय प्रवेशाची परंपरा जुनीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 12:36 PM2020-12-02T12:36:31+5:302020-12-02T12:39:08+5:30

आजवर मराठी कलाकारांची विशिष्ट राजकीय पक्षांशी कमी-अधिक प्रमाणात असलेली बांधिलकी लपलेली नाही...

The political entry of Marathi artists is old tradition! | मराठी कलाकारांची राजकीय प्रवेशाची परंपरा जुनीच!

मराठी कलाकारांची राजकीय प्रवेशाची परंपरा जुनीच!

Next

पुणे : कॉंग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवलेली मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेसला सोडचिठठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु मराठी कलाकार आणि राजकारण हे महाराष्ट्राला काही नवीन नाही. 

मराठी साहित्यात ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून नावलौकिक मिळवलेले गजानन दिगंबर माडगूळकर, ज्येष्ठ कवी ना.धो महानोर, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांपासून ते ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, मच्छिंद्र कांबळी, शरद बनसोडे, महेश मांजरेकर, आदेश बांदेकर, नितीन देसाई, डॉ. अमोल कोल्हे अशी परंपरा चालत आलेली आहे. निळू फुले, राम नगरकर देखील समाजवादी पक्षाशी जोडले होते. दादा कोंडके यांचीही राजकीय पक्षाशी जवळीक होती. राजकीय धुळवडीत उतरून अनेकांनी विविध रंगांचा आनंद लुटला आहे. 

 आजवर मराठी कलाकारांची विशिष्ट राजकीय पक्षांशी कमी-अधिक प्रमाणात असलेली बांधिलकी लपलेली नाही. निवडणुकीत  विशिष्ट पक्षाचा झेंडा हातात घेऊन सहभागी झालेले अनेक कलाकार दिसतात.  जे कलाकार आपल्या क्षेत्रात चांगले काम करीत असतात. त्यांच्या कामांना चालना मिळावी याकरिता देखील कलाकारांना पक्ष प्रवेश खुणावू लागतो. पक्षाच्या वतीने अनेक कलाकार निवडणूक लढवतात देखील; त्यातील काही फ्लॉप ठरतात. काहींची विधानपरिषदेच्या सदस्यत्वपदी थेट वर्णी लागते.

त्यानुसार राजकारणात मराठी कलाकारांची संख्या उल्लेखनीय अशीच म्हणावी लागेल. अगदी अलीकडच्या काळाचा आढावा घेतला तर  श्रीकृष्ण फेम नीतिश भारद्वाज, नंदू माधव, दिपाली सय्यद, वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंत, सविता मालपेकर, माया जाधव, प्रिया बेर्डे, विजय पाटकर, प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, अभिनेता गिरीश परदेशी या कलाकारांनी राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. 

Web Title: The political entry of Marathi artists is old tradition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.