"गोपीनाथ मुंडेंच्या घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 02:34 PM2021-07-14T14:34:55+5:302021-07-14T14:53:20+5:30

chandrakant patil : मुंडेंनी महाराष्ट्रातील भाजपाला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करून दिली. अशा घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Pankaja Munde will never think of rebellion - Chandrakant Patil | "गोपीनाथ मुंडेंच्या घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत"

"गोपीनाथ मुंडेंच्या घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत"

Next

कोल्हापूर : केंद्रातील मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यानंतर मुंडे समर्थक, कार्यकर्ते यांनी राजीनाम्याचा धडाका लावला. यानंतर पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि राजीनामे नामंजूर करत असल्याचे स्पष्ट केले. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी कार्यालयातील भाजपा रस्त्यावर आणली. केवळ पत्रकं काढून भागणार नाही तर रस्त्यावर उतरले पाहिजे या भावनेतून त्यांनी पक्ष वाढवला. अनेक संघर्ष केले. मुंडेंनी महाराष्ट्रातील भाजपाला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करून दिली. अशा घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

एखादी गोष्ट घडली ती आवडली नाहीतर भावना व्यक्त करण्याचा कार्यकर्त्यांना अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी भावना व्यक्त केल्या. प्रीतम ताईंना मंत्रिमंडळात घेतले जावे हे त्यांना वाटत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा बारकाईने निर्णय घेतात. संघटनात्मक जबाबदारी असो की मंत्रिपदं देणे असो त्यांनी लोकांना शोधून शोधून पदं दिली आहेत. पक्षात समतोल साधण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

याचबरोबर, न्याय म्हणजे कोणावर तरी अन्याय होतोच. न्याय सर्वांनाच एकावेळी मिळू शकत नाही. भागवत कराडांना मंत्रिपद मिळाले तर प्रीतम यांना नाही मिळाले. राणेंना मिळाले तर रणजीत निंबाळकरांना नाही मिळाले. केंद्रीय मंत्रिमंडळात 28 जणांना जोडायचे होते. त्यानंतर 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला. देश मोठा आहे. त्यात न्याय मिळतानाच कुणावर तरी अन्याय होतो. त्यात नेता नव्हे कार्यकर्त्याने रिअॅक्ट होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. त्यात काही चुकीचे नाही. पण लगेच सावरणे हे सुद्धा समजदारीचे लक्षण आहे. ते काल पंकजा मुंडे यांनी केले. कुणी राजीनामे द्यायचे नाही. हे आपले घर आहे. आपल्या घरातून का निघायचे बाहेर, असे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर इतके दुखाचे डोंगर कोसळलेले आहेत. तरीही या वयात त्यांनी मॅच्युरीचे टोक दाखवले आणि सांभाळले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद देण्यात आले. यानंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचे सूर पसरले आणि 70 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. नाराज पदाधिकाऱ्यंची समजूत काढण्यासाठी मुंबईतील वरळीमध्ये असलेल्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी काल कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

Web Title: Pankaja Munde will never think of rebellion - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.