Now the allegations-rebuttal from Remedesivir between center and state government | Remedesivir issue: आता रेमडेसीवीरवरून आरोप-प्रत्यारोप; केंद्रात अन् राज्यात जुंपली

Remedesivir issue: आता रेमडेसीवीरवरून आरोप-प्रत्यारोप; केंद्रात अन् राज्यात जुंपली

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई / नवी दिल्ली : राज्यात रेमडेसिविर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून राज्य व केंद्र सरकार आमनेसामने आले आहे. राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आराेप केल्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गाेयल व मनसुख मांडविया यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 


रेमडेसिविर या औषधाची आवश्यकता असताना आणि उपलब्धतादेखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांना ताबडतोब रेमडेसिविरच्या कुपी पुरवल्या जाव्यात, अशी मागणी नवाब मलिक केली आहे.


राज्य सरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिविरबाबत विचारणा केली असता महाराष्ट्रात रेमडेसिविर पुरवठा करण्यास  केंद्र सरकारने बंदी घातली आहे. रेमडेसिविर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे, असे सांगितले आहे. हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे मलिक यांनी म्हटले. त्यामुळे या परिस्थितीत राज्य सरकारकडे या निर्यातदारांकडून रेमडेसिविरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

१६ निर्यातदारांना परवानगी मिळेना
केंद्र सरकारकडून रेमडेसिविर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिविरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाही. केंद्र सरकार त्यास नकार देत असल्याचा आक्षेप अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी घेतला. हे उत्पादन करणाऱ्या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिविर विकले जावे, असे केंद्राचे म्हणणे आहे. मात्र, या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्रापुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे, असेही मलिक म्हणाले. 

त्या १६ कंपन्यांची यादी द्यावी
केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी नवाब मलिक अर्धसत्य आणि खाेटे बाेलत असल्याची टीका केली. ते म्हणाले, केंद्राकडून राज्याला रेमडेसिविरचा पुरवठा करण्यास सर्वताेपरी प्रयत्न सुरू आहेत. उत्पादन दुप्पट करण्यासाठी २० कारखान्यांना परवानगी दिली आहे. सर्व उत्पादकांना संपर्क केला आहे. काेणताही माल अडकलेला नाही. मलिक यांनी नकार देणाऱ्या १६ कंपन्यांची यादी, उपलब्ध साठा ही माहिती द्यावी.


महाराष्ट्राला भ्रष्ट सरकारने ग्रासले 
महाराष्ट्राला अयाेग्य आणि भ्रष्ट सरकारने ग्रासले आहे. केंद्र सरकारने राज्याला सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा केला, तसेच राज्य सरकारसाेबत दरराेज संपर्कात आहे. मात्र, राज्य सरकारकडून ऑक्सिजनवरून राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी, असे गाेयल म्हणाले. सध्या औद्याेगिक वापराचा ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वळविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Now the allegations-rebuttal from Remedesivir between center and state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.