ज्यांना आपलं स्वत:चं गाव सोडून...; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 13:11 IST2021-02-14T13:05:57+5:302021-02-14T13:11:30+5:30
Sharad Pawar taunts Chandrakant Patil: पूजा चव्हाण आतहत्या प्रकरणावर बोलणं शरद पवारांनी टाळलं; चंद्रकांत पाटील यांना टोला

ज्यांना आपलं स्वत:चं गाव सोडून...; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला
पुणे: पूजा चव्हाण नावाच्या तरुणीनं केलेल्या आत्महत्येमुळे शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड अडचणीत आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं केलं आहे. राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका भाजपनं घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गप्प का, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. यानंतर आता पवार यांनी पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Sharad Pawar taunts Chandrakant Patil)
"महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकाला छिद्रे, मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस"
ज्यांना आपलं स्वतःचं गाव सोडून राहण्यासाठी अन्य गावी जावं लागतं, अशा लोकांबद्दल मी बोलायचं का, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. न्याय व्यवस्थेच्या सद्यस्थितीवर माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलेल्या विधानावरही पवारांनी भाष्य केलं. पुण्यात सुरू असलेल्या 'खयाल यज्ञ' संगीत महोत्सवालक त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
"रस्ता वापरणार म्ह्टल्यावर टोल भरावाच लागेल; चंद्रकांत पाटलांसारखी टोलमुक्ती आम्ही देणार नाही..!"
राज्यसभा खासदार आणि माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी शनिवारी केलेलं विधान अत्यंत धक्कादायक आहे. हे विधान म्हणजे न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न तर नाही ना याचाही विचार व्हावा. परंतु, या विधानामुळे प्रत्येकाच्या मनात चिंता निर्माण होणार याबद्दल आपल्या मनात शंका नसल्याचेही ते म्हणाले. देशातील न्यायव्यवस्था किती उच्च आहे, असं गेल्याच आठवड्यात न्यायाधीशांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं, याकडे पवारांनी लक्ष वेधलं.
पुण्यात खयाल यज्ञ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला आज शरद पवार उपस्थित होते. पवारांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे खासदार श्रनिवास पाटील, भाजपचे खासदार गिरीश बापट हजर होते. तीन दिवसीय खयाल यज्ञ कार्यक्रमाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आरती अंकलीकर-टिकेकर, पंडित राहुल देशपांडे, देवकी पंडित, मंजुषा पाटील, पंडित राजन साजन मिश्रा आज त्यांची कला सादर करणार आहेत.