The movement of Ayamas in all political parties; The number of party changers increased with convenience | सर्व राजकीय पक्षांमध्ये आयारामांचीच चलती; सोयीप्रमाणे पक्ष बदलणाऱ्यांची संख्या वाढली

सर्व राजकीय पक्षांमध्ये आयारामांचीच चलती; सोयीप्रमाणे पक्ष बदलणाऱ्यांची संख्या वाढली

नामदेव मोरे 

नवी मुंबई : पक्षांतरावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड व भाजपचे गणेश नाईक यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी सुरू झाली आहे. बाप (पक्ष) बदलणारे नक्की कोण यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक नवी मुंबईच्या राजकारणामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आयारामांसाठी पायघड्या घातल्या आहेत. निष्ठावंत हा शब्द सोयीप्रमाणे वापरण्यात येत असून खरोखर पक्षाशी प्रामाणिक असणारे उपेक्षित राहिल्याचे चित्र अनेक वेळा पाहावयास मिळाले आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये विकासकामांऐवजी वैयक्तिक टीकेला महत्त्व येऊ लागले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांना टार्गेट केले आहे. स्वार्थासाठी नाईकांनी पक्षांतर केले असून त्यांच्याप्रमाणे बाप बदलणारी औलाद आमची नाही, अशा शब्दांत टीका केली आहे. या टीकेला स्वत: गणेश नाईक यांनी प्रतिउत्तर दिले आहे. राजकीय जीवनामध्ये काही वेळा विकासकामांना गती देण्यासाठी पक्षांतर करावे लागते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काँगे्रसमधून बाहेर पडून एस काँग्रेसची स्थापना केली होती. पुन्हा काँगे्रसमध्ये आले व नंतर पुन्हा बाहेर पडून राष्ट्रवादी काँगे्रसची स्थापना केली. पवार यांनाही तोच मापदंड लावायचा का, असा प्रश्न नाईक यांनी आव्हाड यांना विचारला आहे.

नाईक व आव्हाड यांच्यामधील शाब्दिक युद्ध आता कार्यकर्त्यांच्या पातळीवरही सुरू झाले असून शहरात कोणत्या पक्षांमध्ये कोण निष्ठावंत व कोण बाहेरून आलेले यावर चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक नवी मुंबईमध्ये एकही पक्ष मूळ निष्ठावंत कार्यकर्त्यांचा राहिलेला नाही. प्रत्येक पक्षाने सोयीप्रमाणे इतर पक्षातील नगरसेवक, नेते व कार्यकर्त्यांना पायघड्या घातल्या आहेत.

माजी मंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९९ मध्ये त्यांनी शिवसेना सोडून स्वत:चा पक्ष सुरू करण्याचा प्रयत्न केला. यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून दोन वेळा मंत्रिपदही मिळविले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी काँगे्रसपासून राजकीय कारकिर्द सुरू केली.

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर त्यांनीही तेथे जाऊन पक्षाचे महिला प्रदेश अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गणेश नाईक यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून बेलापूर मतदारसंघातून विजय मिळविला. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचाही राष्ट्रवादी काँगे्रस,भाजप व शिवसेना असा प्रवास झाला आहे. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह अनेक प्रमुख नगरसेवकांनी दोन ते तीन वेळा पक्षांतर केले आहे. त्या-त्या वेळी निर्माण झालेल्या राजकीय स्थितीप्रमाणे नेते व पदाधिकारीही पक्ष बदलत असून हे पक्षांतर आता शहरवासीयांसाठी नवीन राहिलेले नाही.

महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक बंडखोरी
नवी मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या काळात सर्वच प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरी होत असते. प्रमुख पक्षांमध्ये काही प्रभागांमध्ये एकापेक्षा जास्त इच्छुक असतात. उमेदवारी मिळाली नाही की दुसरा पदाधिकारी बंडखोरी करून इतर पक्षांमध्ये जात असतो. प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारे बंडखोरी होत असते. गतवेळीच्या निवडणूकीत शिवसेना व भाजपमध्ये युती झाल्यानंतर भाजपला दिलेल्या प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठयप्रमाणात बंडखोरी केली होती. या बंडखोरीमुळेच युतीत अनेक उमेदवार पडले होते.

नेत्यांच्या पक्षांतराविषयीचा तपशील पुढीलप्रमाणे
गणेश नाईक
शिवसेना, शिवशक्ती संघटना, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप
मंदा म्हात्रे
काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप
नरेंद्र पाटील
राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप, शिवसेना
विजय चौगुले
शिवसेना, शिवशक्ती संघटना, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना
एम. के. मढवी
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना
विठ्ठल मोरे
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना
सुरेश कुलकर्णी
शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप, शिवसेना

तुर्भे पाटील परिवार
काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप
चंद्रकांत आगोंडे
शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप, शिवसेना
शिवराम पाटील
अपक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना
अनंत सुतार
शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप
सुधाकर सोनावणे
आरपीआय, अपक्ष, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप
प्रशांत पाटील
राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना
नामदेव भगत
काँग्रेस, शिवसेना

संपत शेवाळे
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप
मनीषा भोईर
राष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप
किशोर पाटकर
अपक्ष, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना
विजय वाळुंज
राष्ट्रवादी काँगे्रस, काँग्रेस, भाजप
रतन मांडवे
शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना
जयवंत सुतार
शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप
रवींद्र इथापे
काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप
साबू डॅनीअल
काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप

Web Title: The movement of Ayamas in all political parties; The number of party changers increased with convenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.