पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मनसेचा आघाडीला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 21:42 IST2019-04-05T21:40:24+5:302019-04-05T21:42:25+5:30
मनसेचे महापालिकेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी त्यांचे महापालिकेचे एक महिन्याचे मनाधन अमोल कोल्हे यांना निवडणूक निधी म्हणून शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.

पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मनसेचा आघाडीला पाठिंबा
पुणे : मनसेच्या नगरसेवकांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. मनसेचे महापालिकेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी त्यांचे महापालिकेचे एक महिन्याचे मनाधन अमोल कोल्हे यांना निवडणूक निधी म्हणून शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, मावळचे उमेदवार पार्थ पवार, शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि पुण्याचे उमेदवार मोहन जोशी यांना पाठिंबा जाहीर करतानाच मोदी व शहा या अभद्र समिकरणाला आणि युतीला जिल्ह्यात पराभूत करण्याची घोषणा केली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आठ दिवसांपुर्वी मोदी-शहा यांच्याविरुद्ध लढा देत असलेल्या उमेदवारांना मदत करण्यासंदर्भात तसेच स्वत:ची प्रचार यंत्रणा राबविण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. गुढी पाडव्याच्या दिवशी मनसेची नेमकी भूमिका समजेल. त्यानुसार पुढील हालचाली केल्या जातील असे नगरसेवक मोरे यांनी सांगितले.
दरम्यान, कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास देशासमोर आणण्याचे काम केले. त्यांना मदत करण्याच्या हेतूने एक महिन्याचे मानधन देण्यात आले आहे. रक्कम मोठी नसली तरी त्यामध्ये जनतेच्या भावभावना आणि प्रेम गुंतलेले असल्याचे मोरे म्हणाले. याप्रसंगी चेतन पाटील तुपे यांनी सांगितले की महाआघाडी बरोबर आज मनसे देखील पूर्ण ताकतीने प्रचारामध्ये उतरली आहे आहे. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होत आहे.