राज ठाकरे लवकरच मोठी घोषणा करण्याच्या तयारीत; भाजप-मनसे युतीची नांदी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 13:25 IST2021-01-29T13:06:43+5:302021-01-29T13:25:51+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज ठाकरे लवकरच मोठी घोषणा करण्याच्या तयारीत; भाजप-मनसे युतीची नांदी?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेअयोध्या दौरा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. येत्या १ ते ९ मार्च दरम्यान राज यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन पक्षाकडून केलं जात असल्याचं समजतं.
मुंबईत वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला मनसेचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीला राज ठाकरे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर राज यांचे पुत्र अमित ठाकरे देखील बैठकीसाठी पोहोचले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मनसेच्या या बैठकीत राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसं झालं तर राज ठाकरे यांचा हा पहिला मोठा दौरा ठरणार आहे.
राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ, ६ फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश
मनसेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाच्या मार्गावर पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजप आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. विशेष म्हणजे, युतीच्या या गणितांबाबत भाजप नेत्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी वेळोवेळी थेट नकार दिला नव्हता.
मनसेची उत्तर भारतीयांविरोधाची भूमिका मवाळ झाली तर पुढचा विचार होऊ शकेल, असंही भाजपकडून विधान करण्यात आलं होतं. आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानं ही मनसे आणि भाजपच्या युतीची नांदी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.