राफेल व्यवहारात मोदींकडून पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर, काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 05:56 IST2019-03-07T05:55:23+5:302019-03-07T05:56:05+5:30
राफेल विमाने खरेदी व्यवहारात द सॉल्ट एव्हिएशन या कंपनीचा फायदा करून देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर केला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

राफेल व्यवहारात मोदींकडून पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर, काँग्रेसचा आरोप
नवी दिल्ली : राफेल विमाने खरेदी व्यवहारात द सॉल्ट एव्हिएशन या कंपनीचा फायदा करून देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर केला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यान्वये त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करता येऊ शकते, असेही त्या पक्षाने म्हटले आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीपसिंह सूरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितले की, राफेल विमाने खरेदी व्यवहाराबाबत बोलणी करून भारतीय शिष्टमंडळाने
घेतलेला अंतिम निर्णय बाजूला सारण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने बोलणी करून या विमानांच्या खरेदीबाबत अंतिम निर्णय घेतला. राफेल विमानांच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याच्या काँग्रेसने याआधीही केलेल्या आरोपांचा केंद्र सरकारने वेळोवेळी इन्कार केला आहे. राफेलबाबत खोटेनाटे आरोप करून काँग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे, असे प्रत्युत्तर भाजपानेही दिले होते.
राफेलचा व्यवहार ६४ हजार कोटींचा
सूरजेवाला यांनी दावा केला की, यूपीए सरकारने ठरविलेल्यापेक्षा कितीतरी जास्त किमतीने मोदी सरकार राफेल विमाने खरेदी करत आहे. तसेच बँकेची हमीही या सरकारने रद्द केली. ३६ राफेल विमाने ५९ हजार कोटी रुपयांना विकत घेत असल्याचा मोदी सरकारचा दावा खोटा आहे. या खरेदीसंदर्भात बोलणी करणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाने हा आकडा ६४ हजार कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राफेलप्रकरणी केंद्र सरकार संसदेची दिशाभूल करत आहे असाही आरोप त्यांनी केला. राफेल व्यवहारात मोदींनी आपले उद्योगपती मित्र अनिल अंबानी यांचा ३० हजार कोटी रुपयांचा फायदा करून दिला असा आरोपही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नेहमीच करत असतात.