Meetings for the last phase today; Modi in Mumbai, Pawar Thane-Dombivli | शेवटच्या टप्प्यासाठी आज सभांचा धडाका; मोदी मुंबईत, पवार ठाणे-डोंबिवलीत

शेवटच्या टप्प्यासाठी आज सभांचा धडाका; मोदी मुंबईत, पवार ठाणे-डोंबिवलीत

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता जरी शनिवारी संध्याकाळी होणार असली, तरी शुक्रवारी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या सभांनी मुंबई-ठाणे परिसर ढवळून निघणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ मुंबईत धडाडेल.

मोदींच्या उपस्थितीतील भाजप-शिवसेना युतीची सांगतेची सभा असल्याने ती जंगी व्हावी आणि त्यात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी भाजपने तयारी केली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानात संध्याकाळी होणाऱ्या या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विविध नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसने शेवटच्या दोन दिवसांत राहुल गांधी यांचा रोड शो आयोजित करण्याचे ठरविले होते. मात्र त्याबाबत अद्याप पक्षातर्फे माहिती देण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार डोंबिवली आणि ठाण्यात जाहीर सभा घेणार आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे यांची ठाण्यात पत्रकार परिषद होणार आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे आधी भिवंडीत आणि नंतर मुंबईत कुर्ला येथे प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांच्या सभा होणार आहेत. राज ठाकरे यांच्या शुक्रवारी जरी नाशिक परिसरात सभा असल्या, तरी शनिवारी ते ठाण्यात मीटिंग घेणार आहेत.

विखेंबाबत उत्सुकता
विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेले काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील मोदींच्या मुंबईतील सभेत उपस्थित राहतात का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Web Title: Meetings for the last phase today; Modi in Mumbai, Pawar Thane-Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.