अनेक आमदार येणार महाविकास आघाडीत; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 07:08 IST2020-12-16T03:05:31+5:302020-12-16T07:08:57+5:30
येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मी आधीच का सांगितले नाही, असे म्हणू नका असेही ते म्हणाले.

अनेक आमदार येणार महाविकास आघाडीत; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गौप्यस्फोट
मुंबई : तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्यामुळे तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला. हे सरकार सहा महिन्यात जाईल, असे भविष्य आपण सांगत होतात. मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित, पदवीधर मतदार यांनीही भाजपला नाकारले असे सांगून, येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मी आधीच का सांगितले नाही, असे म्हणू नका असेही ते म्हणाले.
पुरवणी मागण्यांच्या अनुषंगाने ते विधानसभेत बोलत होते. विधान परिषदेत नागपूरमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती, ती जागा भाजपने गमावली. त्याचा एका गटाला प्रचंड आनंद झाला, मात्र दुसरा गट अस्वस्थ झाला, असे सांगून पवार म्हणाले, पुण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाच पराभव झाला. धुळे-नंदुरबारमध्ये अमरीश पटेल जरी निवडून आले असले तरी, ते आमच्याकडूनच तिकडे गेलेले आहेत. ते कधी परत येतील, हे कळणार नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.
ड्रेसकोडबाबत फेरविचार
सरकारी कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडबाबत सरकार फेरविचार करत आहे, असे ते म्हणाले. ‘ओबीसी’ समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
माझ्याविरुद्ध लढून दाखवा! - अजित पवार
‘माझ्या भाषणात जो अडथळे आणतो तो पुढल्या वेळी निवडून येत नाही,’ असे मिश्कील विधान भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “चला, मी घेतले चॅलेंज. पुढच्या निवडणुकीत मला हरवून दाखवा.” यावर मुनगंटीवार निरुत्तर झाले.