Mahavikas Aghadi's Satish Chavan's hat trick in Marathwada graduate election | मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाणांची विजयी हॅटट्रिक

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाणांची विजयी हॅटट्रिक

औरंगाबाद – मराठवाडा पदवीधर मतदरासंघ निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस होईल अशी शक्यता होती, परंतु पदवीधर मतदारांनी सच का साथ देत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिली पसंतीची १ लाख १६ हजार ६३८ मते देत तब्बल ५७ हजार ८९५ मताधिक्याने विजयी केले, त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली.

चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली विजयी आघाडी पाचव्या फेरीअखेर कायम ठेवली, ३५ उमेदवारांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चव्हाण आणि महायुतीचे उमेदवार बोराळकर यांच्यात मुख्य लढत झाली, दुसऱ्या फेरी अंतीच चव्हाणांची विजयाकडे घौडदौड दिसून आली, सुमारे २० तास मतमोजणी चालली, रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला.

पहिल्या फेरीत चव्हाण यांना २७ हजार २५० मते मिळाली, तर बोराळकर यांना ११ हजार २७२ मते मिळाली, सिद्धेश्वर मुंडे यांना २५०६ , रमेश पोकळे यांना ३ हजार ४७८ मते मिळाली, चव्हाण यांना पहिल्या फेरीअंतीच बोराळकर यांच्यापेक्षा दुप्पट मते मिळाली, दुसऱ्या फेरीअखेरीस शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण ३४ हजार मतांची आघाडी घेतली, दुसऱ्या फेरीअखेरीस भाजपा उमेदवार शिरीष बोराळकर प्रचंड मागे पडले होते.

तिसऱ्या फेरीत सतीश चव्हाण यांना २६ हजार ७३९ मते मिळाल्याने त्यांची एकूण मते ८१ हजार २१६ पर्यंत पोहचली, या फेरीत शिरीष बोराळकरांना १४ हजार ४७१ मते मिळाली, त्याची एकूण मते ४० हजार १८ झाली होती, या फेरी अखेर चव्हाण यांचे मताधिक्य ४१ हजार २०५ पर्यंत पोहचले होते, या फेरीपर्यंत १ लाख ५३ हजार ३० मतांची मोजणी पूर्ण झाली होती, तिसरी फेरी रात्री दीड वाजता घोषित झाली,

चौथ्या फेरीअखेरीस चव्हाण यांना १ लाख ७ हजार ९१६ मते तर भाजपाचे उमेदवार बोराळकर यांना ५४ हजार ३०५ मते मिळाली, या फेरीअखेरीस २१ हजार ३८८ मते बाद झाली, चौथ्या फेरीअखेर २ लाख २५ हजार ७४ मतांची मोजणी झाली, एकूण २ लाख ४० हजार मतदान झाले होते.

भाजपा नेत्यांचा काढता पाय

पहिल्या फेरीची मतमोजणी जाहीर होण्यापूर्वीच भाजपा नेत्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला, उमेदवार शिरीष बोराळकर, खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, विजय औताडे आदींनी मतमोजणी केंद्र सोडले, संजय केणेकर आणि प्रमोद राठोड हे तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीपर्यंत केद्रात होते.

Web Title: Mahavikas Aghadi's Satish Chavan's hat trick in Marathwada graduate election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.