Maharashtra Gram Panchayat Election Results: शिवसेनेनं 'करून दाखवलं'; महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामीण भागांत जोरदार मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 18:59 IST2021-01-18T18:54:35+5:302021-01-18T18:59:25+5:30
Maharashtra Gram Panchayat Election Results: काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांमध्ये शिरकाव; भाजपच्या वर्चस्वालाही धक्के

Maharashtra Gram Panchayat Election Results: शिवसेनेनं 'करून दाखवलं'; महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामीण भागांत जोरदार मुसंडी
मुंबई: सत्तेचा फायदा सत्ताधारी पक्षाला सगळ्या निवडणुकांमध्ये होत असतो. शिवसेनेनं ग्रामपंचायत निवडणुकीत मारलेल्या मुसंडीनं त्याचीच प्रचिती आली आहे. भारतीय जनता पक्षापासून फारकत घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेनं ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागात जोरदार धडक दिली आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेनं पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावात शिवसेनेनं सरशी साधली. विशेष म्हणजे पाटील यांनी शिवसेनेला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली होती. मात्र तरीही खानापूरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकरांनी खानापूरमध्ये पाटलांना शह दिला. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर गावात शिवसेनेनं राष्ट्रवादीला धक्का दिला. पुणे-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या खेज शिवापूरमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे यांच्या पॅनेलनं ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवला.
गावात सत्ता नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष?, हसन मुश्रीफांची चंद्रकांत पाटलांवर टीका
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे, घरनिकी, तळेवाडी, लेंगरेवाडी, देशमुखवाडी आणि धावडवाडी या ग्रामपंचायती तर खानापूर तालुक्यातील माहुली, नागेवाडी, खंबाले, पारे, रेणावी, देवेखिंडी, भडकेवाडी आणि दंडुळगाव या ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या आहेत. यामध्ये शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी ल्हासुर्णे, मंगळापूर, किन्ही आणि कटापुर या ग्रामपंचायती नव्याने जिंकल्या आहेत.
"ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा, भाजपाची मोठी पीछेहाट"
मराठवाडा आणि कोकणात शिवसेनेची चांगली ताकद आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची पक्षसंघटना फारशी मजबूत नाही. मात्र आता महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष आणि त्यातही मुख्यमंत्रिपद असल्यानं शिवसेनेनं पश्चिम महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संघटनेचा फायदा अनेक ठिकाणी शिवसेनेला झाला आहे.