"ईडी, सीबीआयनं भाजप कार्यकर्त्यांसारखं वागू नये; मी भाजपच्या १२० जणांची यादी ईडीला देणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 06:51 IST2020-12-13T03:41:46+5:302020-12-13T06:51:34+5:30
राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्र लढविणार आहे. त्याची सुरुवात नाशिकपासून होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये याविषयी मतभिन्नता असली, तरी नेत्यांचा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले.

"ईडी, सीबीआयनं भाजप कार्यकर्त्यांसारखं वागू नये; मी भाजपच्या १२० जणांची यादी ईडीला देणार"
नाशिक : शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यानुसार कारवाई होत असल्याचा आरोप करतानाच ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थांनी भाजप कार्यकर्त्यांसारखं वागू नये, आपल्याकडेही भाजपच्या १२० लोकांची यादी असून, ती आपण ईडीला पाठवू, असा इशारा शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्र लढताना यश आले असून, नागपूर, पुणे येथील भाजपचा किल्ला ढासळला आहे. त्यामुळे राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्र लढविणार आहे. त्याची सुरुवात नाशिकपासून होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये याविषयी मतभिन्नता असली, तरी नेत्यांचा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईत शिवसेनेचीच सत्ता, मनसेला टोला
मुंबई महापालिकेत मनसे-भाजप युतीची चर्चा रंगू लागली आहे. त्यावर बोलताना मुंबईत शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष असून, सत्ता शिवसेनेचीच येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हैदराबादमध्ये भाजपला ओवैसी मिळाले, मुंबईत काय ते बघू, असे म्हणत त्यांनी मनसेलाही टोला लगावला.