ती आमची राजकीय चाल होती; देवेंद्र फडणवीसांच्या 'गौप्यस्फोटा'वर शरद पवारांचा 'स्फोट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 09:15 IST2020-07-13T08:18:06+5:302020-07-13T09:15:21+5:30
Sharad Pawar Interview With Sanjay Raut: मी स्वत: पार्लामेंटमध्ये त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही, जमलं तर आम्ही शिवसेनेसोबत सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू असं पंतप्रधानांना सांगितले.

ती आमची राजकीय चाल होती; देवेंद्र फडणवीसांच्या 'गौप्यस्फोटा'वर शरद पवारांचा 'स्फोट'
मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीबाबत दावा केला होता की, सत्ता बनवण्यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती, २०१४ च्या सत्ताकाळातही राष्ट्रवादी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी तशारितीने बोलणी सुरु होती. त्यावर शरद पवार यांनी सामनाच्या मुलाखतीत भाष्य केले आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील अंतर वाढावं यासाठी जाणीवपूर्वक पावले टाकल्याचं शरद पवारांनी कबूल केले.
याबाबत शरद पवार म्हणाले की, शिवसेनेला (ShivSena) सोबत घ्यायचं नाही स्थिर सरकार बनवायला आम्हाला साथ द्या असं भाजपाचे काही नेते आमच्या लोकांशी बोलत होते, आमच्यातल्या काही सहकाऱ्यांशी, माझ्याशीही एक-दोनदा बोलले, पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती द्यावी म्हणून माझ्या कानावर निरोप आला. त्यावेळेला तो निरोप आल्यानंतर देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडे आपल्या पक्षाबद्दल आणि आपल्याबद्दल चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी स्वत: पार्लामेंटमध्ये त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही, जमलं तर आम्ही शिवसेनेसोबत सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू, पण आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही आणि हे मी सांगायला जाताना एक गृहस्थ पार्लामेंटमध्ये माझ्या शेजारी होते, त्यांचं नाव संजय राऊत. त्यांना सांगून गेलो की, मी पंतप्रधानांना सांगायला जातोय, मी परत आलो, त्यावेळी राऊत तिथेच होते, त्यांच्या कानावरही मी पंतप्रधानांबरोबरची चर्चा घातली. (Sharad Pawar Interview With Sanjay Raut)
त्याचसोबत शिवसेनेने भाजपाबरोबर जाऊ नये अशी माझी पहिल्यापासून मनात इच्छा होती, ते जातील असे दिसले त्यावेळी मी जाणीवपूर्वक स्टेंटमेंट केले, आम्ही तुम्हाला(भाजपाला) बाहेरुन पाठिंबा देतो, त्यात शिवसेना त्यांच्यापासून बाजूला व्हावी हा हेतू होता, पण तसं घडलं नाही, त्यांनी सरकार बनवलं, भाजपाच्या हातात सरकार चालवू देणं हे शिवसेनेच्या हिताचं नाही. कारण दिल्लीची सत्ता त्यांच्या हातात, राज्याची सत्ता म्हणजे मुख्यमंत्री त्यांच्या हातात. यामुळे शिवसेना आणि अन्य पक्षांना लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार आहे हेच त्यांना मान्य नाही, त्यामुळे भाजपा आज ना उद्या या सर्वांना निश्चितपणे धोका देणार आहेत म्हणून ही राजकीय चाल होती असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे. (Sharad Pawar Interview With Sanjay Raut)
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
दोन वर्षापूर्वी एक स्थिती अशी होती की राष्ट्रवादी आणि भाजपासोबत यायचं असा निर्णय झाला, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच राष्ट्रवादी आणि भाजपा जर सोबत येणार असेल तर शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितलं होतं. जर एकत्र जायचं असेल आणि काँग्रेसला बाजूला ठेवायचं असेल तर शिवसेना आम्हाला सोबत लागेल. शिवसेनेशिवाय आम्ही तुम्हाला घेत नाही, असा निरोप गृहमंत्री अमित शाहांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिला होता, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सचिन पायलट यांचा बंडाचा झेंडा, गेहलोत सरकार अडचणीत
राजस्थानच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्वाचा; काँग्रेसच्या आमदारांना व्हिप जारी
पाहा व्हिडीओ