Instructions to complete inquiry in Dhananjay Munde rape allegation case within a week | धनंजय मुंडे प्रकरणी एका आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना; 'सस्पेन्स' कायम

धनंजय मुंडे प्रकरणी एका आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना; 'सस्पेन्स' कायम

ठळक मुद्देमहिलेवरही ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर आरोप झाले आहेत, वेगळ्या विचारांचे, वेगळ्या भूमिकेचे लोकही एकाच महिलेबद्दल बोलत आहेत. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि अतिरिक्त आयुक्त संदीर कर्णिक, ज्योत्सना रासम यांची बैठक आणखी एक आठवडा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत सस्पेन्स कायम राहिला आहे

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्याचसोबत मला आणि माझ्या वकिलांना जीवे मारण्याचीही धमकी मिळाल्याचा दावा महिलेकडून करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून केली जात आहे. परंतु चौकशी पूर्ण झाल्यावर निर्णय घेऊ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.

राज्याचे गहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांनी संपूर्ण प्रकाराची एका आठवड्यात चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेत, तसेच आरोप भाजपा नेते कृष्णा हेगडे, मनसेचे मनिष धुरी यांनी तक्रारदार महिलेविरोधात केले आहेत, तक्रारदार महिला ब्लॅकमेलर असून हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून पैसे लुबाडते असा आरोप झाल्याने धनंजय मुंडे प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तुर्तास राजीनाम्यापासून दिलासा मिळाला आहे.

याबाबत शरद पवार म्हणाले की, आम्ही धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाबाबत चर्चा केली आहे, त्याचसोबत त्या महिलेवरही ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर आरोप झाले आहेत, वेगळ्या विचारांचे, वेगळ्या भूमिकेचे लोकही एकाच महिलेबद्दल बोलत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसीपी दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, असे आपण सुचवले आहे. आता हे प्रकरण पोलिसांकडे आहे. संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितले.

शुक्रवारी या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि अतिरिक्त आयुक्त संदीर कर्णिक, ज्योत्सना रासम यांची बैठक घेतली, सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मुंबई पोलीस सहा आठवड्यांच्या चौकशीनंतर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी पूर्ण व्हावी अशी सूचना गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे अशी बातमी टीओआयनं दिली आहे. त्यामुळे आणखी एक आठवडा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत सस्पेन्स कायम राहिला आहे.

....तर मी माघार घेते

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तक्रारदार महिलाही आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. कृष्णा हेगडे आणि मनिष धुरी यांनी केलेले सर्व आरोप तिने फेटाळले आहेत. तसेच ‘तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते’, असे ट्विट तिने केले आहे. ‘मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का आले नाहीत? मला हटविण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते’असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Web Title: Instructions to complete inquiry in Dhananjay Munde rape allegation case within a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.