Independent MLA Geeta Jain to build Shivbandhan; Matoshri will join Shiv Sena tomorrow | अपक्ष आमदार गीता जैन बांधणार शिवबंधन; उद्या मातोश्रीवर शिवसेनेत करणार प्रवेश 

अपक्ष आमदार गीता जैन बांधणार शिवबंधन; उद्या मातोश्रीवर शिवसेनेत करणार प्रवेश 

मीरारोड : मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघातील अपक्ष आमदार गीता भारत जैन या उद्या (दि.२४) दुपारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन स्वागत करतील. 

गीता जैन या मीरा भाईंदरच्या महापौर असताना त्यांचे कामकाज व वादग्रस्त मुद्दे यावरून स्थानिक भाजपा नेते आणि आमदार असलेल्या नरेंद्र मेहतांशी बिनसले. त्या नंतर गीता जैन यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली. परंतु गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे नरेंद्र मेहता यांनाच विधानसभेच्या उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत गीता जैन यांनी भाजपामधून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती आणि भाजपाचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. 

निवडणूक निकालानंतर भाजपाने राज्यात सत्ता स्थापनेसाठी मोर्चे बांधणी सुरु केली आणि गीता जैन यांना पुन्हा पक्षासोबत येण्याचा आग्रह धरला. दुसरीकडे शिवसेनेकडून त्यांना आमदार झाल्यापासूनच सेनेत प्रवेशासह राज्यमंत्री पद देण्याची ऑफर आली होती. मात्र त्यावेळी गीता जैन यांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर राज्यातील सत्तेचे सगळेच गणित बदलले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीते सरकार आले.

राज्यातील सत्तेची बदलेलं समिकरण लक्षात घेता गीता जैन यांनी शिवसेनेतच जाण्याचा निर्णय घेतला आहे. या फायदा शिवसेनेला होणार आहे. दरम्यान, गीता जैन यांच्या प्रवेशाने मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणखी बळकट होईल. शिवाय, जैन समाजाच्या आमदार असल्याने राज्यातील जैन समाजाच्या मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांमध्ये देखील शिवसेनेबाबत चांगला संदेश जाईल, असे शिवसेनेतील एका नेत्याने सांगितले . 
 

Web Title: Independent MLA Geeta Jain to build Shivbandhan; Matoshri will join Shiv Sena tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.