Nana Patole: कालच्या भेटीसाठी शरद पवारांकडून मला निमंत्रण नव्हतं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 14:21 IST2021-07-14T14:18:57+5:302021-07-14T14:21:39+5:30
Nana Patole on Sharad Pawar: 'आमच्या नेत्यांनी भेटीत ओबीसी आरक्षणावर चर्चा झाल्याचे सांगितले'

Nana Patole: कालच्या भेटीसाठी शरद पवारांकडून मला निमंत्रण नव्हतं...
मुंबई:काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. त्या भेटीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) नसल्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, आज स्वतः नाना यांनी त्या भेटीवर भाष्य केले आहे. 'त्या भेटीसाठी मला शरद पवारांचे निमंत्रणच नव्हते', असा दावा नानांनी केला.
नाना आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना काँग्रेस नेत्यांची घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीबाबत विचारण्यात आले. त्याबाबत बोलताना नाना म्हणाले की, 'मला शरद पवारांचे निमंत्रणच नव्हते, की नानांना घेऊन या वगैरे...मला त्या भेटीची माहितीही नव्हती. आमचे नेते त्यांना भेटल्यानंतर मी त्यांना विचारले, त्यावर त्यांनी मला ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. मला राग आलाय, अशातला भाग नाही. मी माझ्या पक्षाचे काम करतोय, जर माझ्या पक्षाचे काम करताना जर कोणाला राग येत असेल तर मला काही अडचण नाही,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
2024 मध्ये काँग्रेसची सत्ता येणार
यावेळी नाना यांनी आगामी निवडणुकांबाबतही भाष्य केले. बैठकीत निवडणुकांबात चर्चा झाली, तुर्तास महाआघाडीत कोणतेही फेरबदल होणार नाहीत. हायकंमाड जे निर्देश देतील त्यावर मी काम करतो. मला भाजपवर अटॅक करायची जबाबदारी दिलीये, मी रोज भाजपच्या नितीवर अटॅक करत राहणार. ओबीसींचे आरक्षण भाजपने संपवले त्याविरोधात राज्यात आम्ही आंदोलन करणार आहोत, अशीही माहिती नाना पटोलेंनी दिली. तसेच, मी माझ्या पक्षाचे काम करतोय, 2024 मध्ये काँग्रेस पक्ष देशात सरकार बनवेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.