साताऱ्यात हाय व्होल्टेज भेट; 'जानी दुश्मन' उदयनराजे-रामराजेंमध्ये गप्पा रंगल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 08:12 PM2020-10-31T20:12:27+5:302020-10-31T20:22:02+5:30

UdayanRaje Bhosale, Ramraje nimbalkar: दोन्ही राजेंची नाराजी संपली : कोरोनापासून बचावासाठी एकमेकांना सल्ले

High voltage visit in Satara; 'Jani Dushman' Udayan Raje-Rama Raje meet | साताऱ्यात हाय व्होल्टेज भेट; 'जानी दुश्मन' उदयनराजे-रामराजेंमध्ये गप्पा रंगल्या

साताऱ्यात हाय व्होल्टेज भेट; 'जानी दुश्मन' उदयनराजे-रामराजेंमध्ये गप्पा रंगल्या

Next

सातारा : राजकारणात कधीच कोणी कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू असत नाही. निवडणुका आल्या की एकमेकांना पाण्यात पाहणारे विजयानंतर एकमेकांची गळाभेट घ्यायलाही विसरत नाहीत. सातारच्या खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात मात्र टोकाचे मतभेद. ते निवडणुकीपुरते मर्यादित नव्हते. त्याच्याही पलीकडे होते. यांच्यामध्ये समेट घडून आल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर हे दोन्ही नेते एकमेकांशी हास्यविनोद करत गप्पा मारताना पाहायला मिळाले. पण, मनातील खंत लपून राहिली नाही.


विधान परिषदेचे सभापती रामराजे आणि राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे दोन्ही नेते एकमेकांवर अनेक वर्षांपासून खार खाऊन आहेत. खासदार शरद पवार यांनी अनेकदा उदयनराजेंच्या बाजूने दिलेला कौल रामराजेंना पसंत पडला नव्हता. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक असो अथवा लोकसभेची उमेदवारी यावरून रामराजे यांचा उदयनराजेंना कायमच विरोध पाहायला मिळाला. फलटणच्या राजकारणामध्ये रामराजे यांचे कट्टर विरोधक असलेले खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी असलेली उदयनराजेंची मैत्री तर सर्वश्रूतच आहे. रणजितसिंह यांच्या मैत्रीखातर फलटणमध्ये जाऊन रामराजेंना आव्हान देण्याचे काम अनेकदा उदयनराजेंनी केलेले आहे. तर आज ज्या ठिकाणी या दोन्ही नेत्यांची बैठक झाली, त्या ठिकाणाहून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोन्ही नेते एकमेकांवर शेलक्या भाषेत टीका करत होते.


लोकसभेच्या पोटनिवडणुकीत देखील रामराजेंनी उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या भर पावसातील सभेत देखील रामराजेंनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली होती. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला. आता उदयनराजे भाजपमध्ये आहेत तर रामराजे राष्ट्रवादीतच! मात्र एका पक्षात असताना मांडीला मांडी लावून न बसणारे हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात असून देखील हास्यविनोदात गुंतलेले पाहायला मिळाले.


शनिवारी दुपारी रामराजे शासकीय विश्रामगृहावर एका कक्षात बसलेले होते. त्याचवेळी उदयनराजे देखील आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्याला भेटण्यासाठी विश्रामगृहावर आले. रामराजे देखील विश्रामगृहावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते थेट रामराजे यांना भेटायला गेले. या ठिकाणी दोघांनी दिलखुलास गप्पा देखील मारल्या. कोरोनापासून काळजी घेण्याबाबतचा दोघांनी एकमेकांना सल्ला दिला.


दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दोघांनाही एकमेकांना भेटायचे होते, याच उद्देशाने ठरवून हे दोन्ही नेते एकत्र आल्याची चर्चा सुरू झाली आहे. हीच भेट उदयनराजे रामराजे यांच्या मैत्री पर्वाची नांदी ठरते की काय? असा तर्कदेखील राजकीय वर्तुळातून काढला जात आहे.


उदयनराजेंच्या गालावर खळीदार हास्य... रामराजेंचे मात्र मास्क
रामराजे उदयनराजे एकमेकांशी गप्पा मारत असताना उदयनराजेंच्या गालावर खळीदार हास्य फुलले होते तर रामराजे यांच्या तोंडावर मास्क पाहायला मिळाले. मात्र गप्पा मारताना त्यांनी आपले मास्क उतरून ठेवले.
 

Web Title: High voltage visit in Satara; 'Jani Dushman' Udayan Raje-Rama Raje meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.