harsimrat kaur badal targets government over agriculture bills | "आम्ही आधी हात जोडत होतो, पण आता आपण दिल्ली हादरवू", हरसिमरत कौर यांचा इशारा

"आम्ही आधी हात जोडत होतो, पण आता आपण दिल्ली हादरवू", हरसिमरत कौर यांचा इशारा

नवी दिल्ली - कृषी विधेयकांवरून राज्यसभेत विरोधकांनी माइक तोडला, कागदपत्रे फाडली, धक्काबुक्की केली. मात्र या विरोधाला न जुमानता सरकारने प्रचंड गदारोळातच विधेयके आवाजी मतदानाने मंजूर करून घेतली. शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभीकरण) विधेयक, 2020 आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) करार किंमत आश्वासन आणि कृषीसेवा विधेयक, 2020 ही दोन कृषी विधेयके राज्यसभेत रविवारी गदारोळात मंजूर करण्यात आली. यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी विधेयकांना तीव्र विरोध केला. कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयकांच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल मोदी सरकारचा राजीनामा देतील, अशी घोषणा सुखबीर सिंग बादल यांनी लोकसभेत केल्यानंतर हरसिमरत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 

केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हरसिमरत कौर बादल आणि त्यांचा पक्ष शिरोमणी अकाली दल आक्रमक झाले आहेत. कृषी विधेयकांच्या मुद्यावरून शेतकऱ्यांमध्ये असलेल्या असंतोषावरून अकाली दल आता शेतकऱ्यांसाठी मोठी लढाई लढण्याच्या मनस्थितीत आहे. अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी कृषी विधेयकांवरून गुरुवारी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. "आम्ही आधी हात जोडत होतो, पण आता आपण दिल्ली हादरवू" असं हरसिमरत कौर यांनी म्हटलं आहे.

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष

हरसिमरत कौर बादल गुरुवारी आपल्या शेकडो समर्थकांसह दमदमा साहिबमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी समर्थकांना आणि शेतकर्‍यांना संबोधित केलं. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना आमचा विरोध आहे आणि आता अकाली दल या लढ्यात शेतकऱ्यांसोबत आहे असं हरसिमरत कौर यांनी म्हटलं आहे. कृषी विधेयकाविरोधात पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष असलेला पाहायला मिळत आहे. 

हरसिमरत कौर बादल यांचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा

हरसिमरत कौर बादल यांनी कृषी विधेयकांना विरोध करत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. अकाली दलाने केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधात मतदान करत संसदेपासून ते रस्त्यापर्यंत या विरोधात उतरण्याचा इशारा दिला होता. केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल मोदी सरकारमधील अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी होत्या.आम्ही कृषी विधेयकांचा विरोध करूनही केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आमचं ऐकलं नाही, असा आरोप हरसिमरत कौर बादल यांनी केला आहे. 

कृषी विधेयकावरून रालोआने फसविले; अकालीची भावना

मोदी सरकारने आणलेल्या कृषी सुधारणा विधेयकामुळे शिरोमणी अकाली दलाच्या मनात राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (रालोआ) फसवलं गेल्याची भावना आहे, असे पक्षाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत बादल यांनी सांगितलं की, या विधेयकामुळे देशाचे संघीय संरचना आणि पंजाबची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल. बादल यांनी सांगितले की, कृषी विधेयकामुळे मी दु:खी झालो आहे. काँग्रेसच्या शेतकरीविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी रालोआची स्थापना करण्यात आली होती. माझे वडील सरदार प्रकाशसिंग बादल हे त्याचे संस्थापक सदस्य होते. काँग्रेसच्या धोरणांना विरोध केल्यामुळे माझ्या वडिलांना तिहारच्या तुरुंगात डांबण्यात आले होते. तेथूनच याची खरी सुरुवात झाली होती. हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला, याचा अर्थ अकाली दल-भाजपची युती संपली असा होतो का, या प्रश्नावर बादल यांनी सांगितलं की, आमच्या पक्षाची गाभा समिती परिस्थितीचे आकलन करून यावर योग्य तो निर्णय घेईल. दुर्दैवाने, कृषी अध्यादेश आणताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. आमच्या पक्षात रालोआकडून फसवले गेल्याची भावना आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता

याला म्हणतात नशीब! जुन्या कार विकून 'ते' झाले करोडपती, एका दिवसात कमावले 51,471 कोटी

बापरे! 15 लाखांची रोकड अन् 70 कोटींचं घबाड; पोलीस अधिकाऱ्याची संपत्ती पाहून सर्वांचीच उडाली झोप

क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; कापली जीभ 

'मी मास्क घालत नाही' म्हणणाऱ्या भाजपा नेत्याचा यू-टर्न, म्हणाले...; Video व्हायरल

English summary :
harsimrat kaur badal targets government over agriculture bills

Web Title: harsimrat kaur badal targets government over agriculture bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.