Give details of expenditure on pm Modis campaign first Then ask questions to Raj Thackeray says mns | 'आधी मोदींच्या दौऱ्यांवरील खर्चाचा तपशील द्या; मग राज ठाकरेंच्या सभांच्या खर्चावर बोला'
'आधी मोदींच्या दौऱ्यांवरील खर्चाचा तपशील द्या; मग राज ठाकरेंच्या सभांच्या खर्चावर बोला'

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा कुणासाठी आणि खर्च कोणाच्या खात्यात जमा करणार अशी विचारणा निवडणूक आयोगाकडे करणाऱ्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना आता मनसेनं उत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या दौऱ्यांच्या खर्चाचा तपशील भाजपानं आधी जनतेला द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मणिपूर अशा विविध राज्यांचा दौरा केला. याबद्दलचं स्पष्टीकरण तावडे देऊ शकतील का? अशी विचारणा किल्लेदार यांनी केली. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या विक्रमी सभांचा धसका भाजपा नेत्यांनी घेतला असून त्यांच्या भाषणाचा प्रभावानं भाजपाच्या मतांवर परिणाम होईल, या भीतीपोटी बिथरलेल्या तावडे यांनी तथ्य नसतानाही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. मात्र याचा त्यांना काडीमात्र फायदा होणार नाही असं किल्लेदार यांनी सांगितलं.

आतापर्यंत झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत त्यांनी कोणत्याही पक्षाचं चिन्ह, झेंडा न लावता अमूक उमेदवाराला मत द्या असं भाषण दिलेलं नाही. गेल्या ५ वर्षांच्या काळातील भाजपाची धोरणं आणि फसवेगिरी यांना बळी पडू नये, हेच आव्हान त्यांनी जागरूक नागरिकांना केलं. राज ठाकरे कोणत्या पक्षाचा अथवा उमेदवाराचा प्रचार करत नाहीत. जाहीर सभा घेऊन पंतप्रधानाबद्दल आपलं मत मांडण्याचा अधिकार त्यांना नाही का? असा सवाल किल्लेदार यांनी विचारला. विकासाच्या मुद्द्यांवर भाष्य करायचं टाळून त्यांच्या सभेच्या खर्चाचा बोलबाला करणं हा राज ठाकरे यांचा दराराच म्हणावा लागेल, असं किल्लेदार म्हणाले.   
 


Web Title: Give details of expenditure on pm Modis campaign first Then ask questions to Raj Thackeray says mns
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.