Devendra Fadnavis would have arrest Nitesh Rane in fraud case: MP Vinayak Raut | नितेश राणेंकडून १२ कोटींचा गंडा, फडणवीसांनी अटकच केली असती पण...; खासदार राऊतांचा गौप्यस्फोट

नितेश राणेंकडून १२ कोटींचा गंडा, फडणवीसांनी अटकच केली असती पण...; खासदार राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील फायरब्रँड नारायण राणे हे भाजपात का गेले, याचा गौप्यस्फोट सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तत्कालीन काँग्रेसचे व सध्याचे भाजपाचे आमदार राणे सुपूत्र नितेश राणे यांनी मुंबईतील एका व्यक्तीला 12 कोटींना फसविल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना तुरुंगात धाडणार होते, असा गंभीर आरोप राऊत यांनी करत एकच खळबळ उडवून दिली आहे. 


कणकवलीमध्ये एका कार्यक्रमात राऊत यांनी हा आरोप केला आहे.  नितेश राणेंनी नवी मुंबईत एका व्यक्तीला 12 कोटींचा गंडा घातला होता. या प्रकरणाची फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. ते नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते. पण नारायण राणे भाजपला शरण गेल्याने ती केस थांबली. आम्ही मनात आणलं तर ती केस एका दिवसात ओपन करू शकतो. असे झाल्यास दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. 

नामांतराच्या वादात नितेश राणेंची उडी

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलाच गाजत आहे. एकीकडे नामांतरासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेला महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून विरोध होत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपा आणि मनसेकडून नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला सातत्याने डिवचण्याचे काम सुरू आहे. आता या मुद्द्यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. मर्द असाल तर औरंदाबादचे संभाजीनगर असे नामांतर करून दाखवा, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य करताना नितेश राणे म्हणाले की, मर्द असाल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवा. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करून दाखवा. नाहीतर तुम्हाला काय सर्टिफिकेट द्यायचं ते आम्ही देऊ. असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

नारायण राणेंचे मातोश्रीवर फोनावर फोन
दोन महिन्यांपूर्वी दिवसातून तीन-तीन वेळा नारायण राणे मातोश्रीवर फोन करत होते, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला आहे. फडणवीसांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही. परंतू ठाकरेंनी ती केवळ  कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्याकारणाने परवानगी दिली. ठाकरेंना काही कळत नाही, असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा, असा टोलाही त्यांनी हाणला आहे. 

Web Title: Devendra Fadnavis would have arrest Nitesh Rane in fraud case: MP Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.