devendra fadnavis will face defeat if he contests the elections says jayant patil | फडणवीसांनी निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून पराभूत होतील; जयंत पाटील यांचा टोला

फडणवीसांनी निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून पराभूत होतील; जयंत पाटील यांचा टोला

ठळक मुद्दे"महाविकास आघाडी किती भक्कम आहे याची प्रचिती विरोधकांनी आली असेल"पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडी यशजलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर केली टीका

मुंबई
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. "फडणवीस यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून त्यांचा पराभव होईल", असा खोचक टोला जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला आहे. 

"महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वगैरेच्या वल्गना केल्या जात होत्या. तीन चाकी सरकार असं हिणवलं जात होतं. पण महाविकास आघाडीची ताकद या निवडणुकीत भाजपला लक्षात आली असेल. फडणवीसांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्याचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव होईल इतकी भक्कम आघाडी आमची आहे", असं जयंत पाटील म्हणाले. 

जयंत पाटील यांनी यावेळी विजय उमेदवारांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन देखील केलं. "महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आल्यावर काय होते, हे ही निकालाने दाखवून दिले आहे. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील व मित्र पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व महाराष्ट्रातील जनतेचे विनम्र आभार", असं जयंत पाटील म्हणाले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध झाल्याचंही ते पुढे म्हणाले. 

फडणवीसांचा शिवसेनेला टोला
भाजपच्या पराभवावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही नेमकं कुठं कमी पडलो याचं आत्मचिंतन करणार असल्याचं म्हणतानाच शिवसेनेलाही टोला लगावला आहे. "आम्ही का पराभव झाला याचं आत्मचिंतन करुच, पण राज्यात ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यांनीही याचं आत्मचिंतन करावं", असं फडणवीस म्हणाले.

Web Title: devendra fadnavis will face defeat if he contests the elections says jayant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.