शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Vaccine : "केंद्राने जनतेला वाऱ्यावर सोडले, राज्याने सोडू नये; वेळप्रसंगी कर्ज काढावे पण सर्वांचे लसीकरण करावे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 16:58 IST

Congress Nana Patole Slams PM Narendra Modi Over Corona Virus And Vaccine : "केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काँग्रेसला सल्ला देण्याआधी गुजरात, उत्तर प्रदेश या भाजपाशासीत राज्यातील परिस्थिती नीट पहावी. तिथे प्रेताचे खच पडले आहेत."

मुंबई - कोरोनाच्या भयानक स्थितीचा महाराष्ट्र सामना करत असताना केंद्र सरकारने राज्याला योग्य ती मदत करणे अपेक्षित आहे. परंतु रेमडेसिवीर, ऑक्सिजनअभावी जीव जात असतानाही त्यात राजकारण केले जात आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. राज्य सरकारने रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी निविदा काढली असता दोन कंपन्या ज्या आतापर्यंत राज्याला दररोज ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देत होत्या त्यांनी आश्चर्यकारक रित्या आपली भूमिका बदलून ३१ मे पर्यंत आम्ही महाराष्ट्राला दररोज फक्त ५०० इंजेक्शनचा पुरवठा करू असे सांगितले. या कंपन्यांच्या बदललेल्या भूमिकेमागे केंद्र सरकारने त्यांच्यावर टाकलेला दबाव कारणीभूत आहे का? राज्याला रेमडेसिवीर मिळू नये आणि इथली स्थिती बिघडावी असा केंद्राचा प्रयत्न आहे का? असे प्रश्न उपस्थित करत कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांनी आता आपली जबाबदारी राज्य सरकारांवर ढकलून जनतेला वाऱ्यावर सोडले आहे पण राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडू नये वेळप्रसंगी कर्ज काढावे आणि सर्वांचे लसीकरण करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोनाविरोधातील लढ्यासंदर्भात काही सकारात्मक सूचना केल्या होत्या. माजी पंतप्रधानांनी केलेल्या सुचनांचा आदर करणे अपेक्षित असताना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काँग्रेसशासित राज्यातच कोरोनाची वाईट परिस्थिती आहे त्यांना सल्ला द्या असे उर्मट उत्तर दिले. काँग्रेसने या महामारीत कधीच राजकारण केले नाही आम्ही लोकांसाठी काम करत आहोत. पण केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काँग्रेसला सल्ला देण्याआधी गुजरात, उत्तर प्रदेश या भाजपाशासीत राज्यातील परिस्थिती नीट पहावी. तिथे प्रेताचे खच पडले आहेत. परिस्थिती एवढी भयानक आहे की हाय कोर्टाला हस्तक्षेप करून तेथील राज्य सरकारची खरडपट्टी काढली याची त्यांनी आधी माहिती घ्यावी आणि नंतर बोलावे असे पटोले म्हणाले.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोना परिस्थितीत थोडासा सुधार झाला त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना मुक्तीचे श्रेय घेण्यासाठी आता कोरोनाची भिती राहिली नाही, असे प्रसिद्धीपत्रक काढून जनतेला कोरोनाच्या खाईत ढकलण्याचे पाप केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही निवडणुका असलेल्या राज्यात कोरोना नाही अशी मुक्ताफळे उधळली आहेत. निवडणुकीमुळे कोरोना नष्ट होत असेल तर मग केंद्रातील सरकारही बरखास्त करून सर्व देशात निवडणुका लावाव्यात कोरोना नष्ट होईल असा टोला पटोले यांनी लगावला. राहुल गांधी यांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून पश्चिम बंगाल मधील प्रचारसभा रद्द केल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही प्रचारसभा रद्द केल्या परंतु प्रधानसेवक मात्र आजही दिवसाला चार-चार सभा घेत आहेत.

देशात ४५ वर्षावरील लोकांनाच कोरोनाची लस देण्याचा नियम असताना देवेंद्र फडणवीसांचे नातेवाईक असलेल्या २५ वर्षीय तन्मय फडणवीस यांना लस कशी मिळाली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच मंत्र्यांच्या गाडीवरील लाल दिवे काढून आपल्या सरकारकडून कोणालाही व्हिआयपी ट्रीटमेंट मिळणार नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. पण मोदी सत्तेत आल्यापासून गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह यांच्यासह भाजप नेत्यांचे नातेवाईक आणि दोन चार निवडक उद्योगपती मित्र यांच्यासाठीच सरकार काम करत आहे अशी परिस्थिती आहे.  

राहूल गांधी यांच्यावर हीन पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना पटोले म्हणाले की, कोणाला फेकू म्हटले जाते, कुणाला तडीपार म्हटले जाते, कुणाला टरबुजा म्हटले जाते, कुणाला चंपा म्हटले जाते. पण कोणाच्या नावाचा अपभ्रंश करून उल्लेख करण्याची काँग्रेसची आणि महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यांनी आम्हाला काहीही म्हटले तरी राहुल गांधी आणि नाना पटोले लोकांच्या हिताचे प्रश्न उचलत राहतील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. या पत्रकारपरिषदेला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अतुल लोंढे, गोपाळ तिवारी, प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, डॉ. संजय लाखे पाटील, देवानंद पवार, राजाराम देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र