'विमानतळावर झालेलं दांडिया नृत्य बरंच काही सांगून जातं', काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 02:46 PM2021-07-20T14:46:02+5:302021-07-20T14:49:06+5:30

Sachin Sawant : 'एएएचएल'चे मुख्यालय देखील गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Congress Leader Sachin Sawant Attacks Modi Government After AAHL Shifted Its Head Office To Ahmedabad | 'विमानतळावर झालेलं दांडिया नृत्य बरंच काही सांगून जातं', काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

'विमानतळावर झालेलं दांडिया नृत्य बरंच काही सांगून जातं', काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

googlenewsNext

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड (एएएचएल) कंपनीचे मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय अदानी समूहाने घेतला आहे. अदानींनी घेतलेल्या या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. या निर्णयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अदानी समूहाला इशारा दिल्यानंतर आता काँग्रेसने थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून मुंबईचे महत्त्व जाणीवपूर्वक कमी केले जात आहे. त्यासाठी येथील उद्योगधंदे व महत्त्वाची कार्यालये गुजरातमध्ये नेली जात आहेत, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता 'एएएचएल'चे मुख्यालय देखील गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

"मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेले दांडीया नृत्य बरंच काही सांगून जाते. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले, त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्रही असेच गुजरातला नेले गेले," असे सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

याचबरोबर, "महाराष्ट्राने कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आपपरभाव दाखवला नाही. अनेक उद्योजक महाराष्ट्रात आले व महाराष्ट्राचे झाले. मुंबई विमानतळ आधी GVK या आंध्रप्रदेशच्या कंपनीकडे होते. GVK ने मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्रप्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही,' असेही सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संकटात सापडलेल्या जीव्हीकेकडून अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा (मिआल) ताबा स्वत:कडे घेतला आहे. त्याचबरोबर नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाचा ताबाही अदानींच्या 'एएचएल'कडे गेला आहे. विमानतळाची खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 'एएएचएल'ने मुंबईत मुख्यालय थाटले होते. पण खरेदी प्रक्रिया पूर्ण होताच कंपनीने आपले मुख्यालय मुंबईहून गुजरातमध्ये अहमदाबादला हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल -  मनसे
नवी मुंबई विमानतळाचं व्यवस्थापन अदानी समूहाला मिळाल्यानंतर माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलं आहे. विमानतळ मुंबईमध्येच आहे. त्यामुळे आम्हाला डीवचण्यासाठी 'गरबा' कराल तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल, असा इशारा नितीन सरदेसाई यांनी दिला आहे. 

अदानी समूह एकूण ७४  टक्क्यांचा भागीदार होईल
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) या कंपनीत जीव्हीके समुहाची हिस्सेदारी ५०.५० टक्के, बिडवेस्ट कंपनीचा हिस्सा १३.५० टक्के आणि ‘एअरपोर्ट कंपनी ऑफ साऊथ आफ्रिका’यांची भागीदारी १० टक्के होती. फेब्रुवारी २०२१मध्ये अदानी समुहाने २३.५० टक्के हिस्सा १ हजार ६८५ कोटी रुपयांना खरेदी केला.  आता जीव्हीके समुहाकडील ५०.५० टक्के हिस्सा ताब्यात आल्याने अदानी समूह एकूण ७४  टक्क्यांचा भागीदार होईल. उर्वरित २६ टक्के हिस्सा भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आहे.

दरम्यान, टेकओव्हर पूर्ण झाल्यानंतर गौतम अदानी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, जागतिक दर्जाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचे टेकओव्हर केल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही मुंबईला गौरवान्वित वाटावे असे काम करू, हे आमचे वचन आहे. अदानी समूह व्यवसाय. लक्झरी आणि मनोरंजनासाठी भविष्यातील विमानतळांचे इकोसिस्टिम उभे करेल. आम्ही हजारो स्थानिक लोकांना नवा रोजगार देऊ, असं आश्वासन अदानी यांनी दिलं आहे.

गेल्या वर्षी तीन ठिकाणचे व्यवस्थापन मिळाले
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडची स्थापना २ मार्च २००६ रोजी झाली होती. ही कंपनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास, निर्मिती आणि परिचालनाचे काम करते. अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड ही अदानी एन्टरप्राईजेसची उपकंपनी त्यांच्या अखत्यारीतील विमानतळांचे व्यवस्थापन पाहते. गेल्या वर्षी मंगळुरू, लखनऊ आणि अहमदाबाद विमानतळाचे व्यवस्थापन अदानी समुहाच्या ताब्यात आले होते.

Web Title: Congress Leader Sachin Sawant Attacks Modi Government After AAHL Shifted Its Head Office To Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.