cm Uddhav Thackeray and Narayan Rane will come on the same stage for opening of kokan airport at chipi | कोकणात 'हायव्हॉल्टेज' कार्यक्रम! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- नारायण राणे एकाच मंचावर येणार

कोकणात 'हायव्हॉल्टेज' कार्यक्रम! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- नारायण राणे एकाच मंचावर येणार

सिंधुदुर्गातील बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाच्या उदघटनाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता चिपी विमानतळाचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्त उदघाटन होणार आहे. 

उदघाटन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे देखील उपस्थित राहणार असल्याचं समजतं. यामुळे या विमानतळाच्या उदघाटनाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. दोघांमधून विस्तवही जात नाही. नारायण राणे यांच्यासह त्यांचे सुपुत्र निलेश आणि नितेश सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत असतात. अनेकदा राणे यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा यांचा एकेरी उल्लेख करुन टीका केली आहे. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत राणेंना प्रत्युत्तर देखील दिलं होतं. अशा परिस्थितीत ठाकरे आणि राणे एकाच मंचावर येणार असल्याने संपूर्ण राज्याचं या कार्यक्रमाकडे लक्ष असणार आहे. 

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ जानेवारीला चिपी विमानतळाचे उदघाटन केले जाणार आहे. या विमानतळाचे उदघाटन प्रजासत्ताक दिनी होणार असल्याची चर्चा सुरू होती. पण आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा दिवस उदघाटनासाठी निश्चित करण्यात आला आहे. 
 

Web Title: cm Uddhav Thackeray and Narayan Rane will come on the same stage for opening of kokan airport at chipi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.