"दिल्ली हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे अयोग्य, भाजपा सामील असल्याचा अपप्रचार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 16:20 IST2021-01-27T16:18:39+5:302021-01-27T16:20:04+5:30
chandrakant patil : हिंसाचार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला, असा खोटा अपप्रचार केला जात असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

"दिल्ली हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे अयोग्य, भाजपा सामील असल्याचा अपप्रचार"
सांगली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या घटनेनंतर देशात खळबळ उडाली असून या हिंसाचारामागे नक्की कोण आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. तर काही राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत सांगलीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली झालेल्या हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही. हिंसाचार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला, असा खोटा अपप्रचार केला जात असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याशिवाय, दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील एक प्रकारे समर्थन करत आहेत, असा आरोप सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
"दिल्लीच्या हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही. हिंसाचार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला, असा खोटा अपप्रचार केला जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मंत्री आहेत. त्यांनी जबाबदारचे भान ठेवून विधान करावे. दिल्लीतील हिंसाचाराचे जयंत पाटील एक प्रकारे समर्थन करत आहेत, त्यांनी केंद्र सरकारवर हिंसाचाराला जबाबदार धरण चुकीचे आहे," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन योग्यप्रकारे न हाताळल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. गेले अनेक दिवस देशातील शेतकरी दिल्लीला गराडा घालून बसले होते. परंतु, सरकारने आडमुठेपणा दाखवत शेतकऱ्यांना दाद दिली नाही, असे सांगत दिल्लीत घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.