केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध पुण्यातही गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 10:50 IST2021-08-24T10:03:38+5:302021-08-24T10:50:15+5:30

Narayan Rane : नारायण राणे यांच्या विरुद्ध पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A case has also been registered against Union Minister Narayan Rane in Pune | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध पुण्यातही गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध पुण्यातही गुन्हा दाखल

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनआशिर्वाद यात्रेदरम्यान आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरुद्ध पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिवसेनेचे युवा चिटणीस रोहित कदम (रा. पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी टीव्ही न्यूज चॅनेल पहात असताना त्यात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करुन दोन गटात  तेढ निर्माण होऊन दंगा होणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या गैरहेतूने चिथावणी देणारे वक्तव्य केलेले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने त्यांचे चाहते, समूह व त्यांचे पक्षातील गट हा आक्रमक होऊन त्यातून काही तरी अनुचित प्रकार घडावा, जेणेकरुन महाराष्ट्रातील परिस्थिती अस्थिर करुन त्याचा गैरफायदा घेण्याचे गैरहेतूने जाणिवपूर्वक परिणामांची कल्पना असताना हे वक्तव्य करण्यासाठी नारायण राणे यांनी जाणिवपूर्वक व हेतूपुरस्कर पत्रकार परिषद घेतली आहे, असे या फिर्यादीत म्हटले आहे. 

त्यानुसार, नारायण राणे यांच्याविरुद्ध मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्याबरोबर या गुन्ह्याचा तपास करु करण्यात आला असून अधिक माहिती जाणून घेतली जात आहे. शहर पोलीस दलातील दोन पोलीस अधिकारी त्याबाबत माहिती घेण्यासाठी चिपळूणला रवाना झाले असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. याबाबत सकाळी न्यायालयातून वॉरंट घेण्याची शक्यता असून न्यायालय नेमके कशा प्रकारचे वॉरंट बजावते, यावरुन पुढील प्रक्रिया अवलंबून आहे. त्यामुळे त्यानंतरच योग्य ती माहिती देऊ असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
 

Web Title: A case has also been registered against Union Minister Narayan Rane in Pune