BJP's strong push in Hyderabad Municipal Corporation; Shake the fort of Owesi | हैदराबाद महापालिकेत भाजपाची जोरदार मुसंडी; ओवेसींच्या गडाला हादरा

हैदराबाद महापालिकेत भाजपाची जोरदार मुसंडी; ओवेसींच्या गडाला हादरा

हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली असून सुरुवातीला आलेल्या कलानुसार भाजपाने जोरदार मुसंडी मारलेली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गडामध्ये भाजपा ४० जागांवर आघाडीवर असून सत्ताधारी टीआरएस १४ जागांवर आघाडीवर आहे. भाजपाने यंदा मोठमोठे नेते प्रचारात उतरविले होते. 


भाजपाला २०१६ च्या निवडणुकीत ५ जागा जिंकता आल्या होत्या. यामुळे आजची ही आघाडी भाजपाला फायद्याचीच म्हणावी लागणार आहे. ग्रेटर हैदराबाद नगर पालिका (जीएचएमसी) निवडणुकीत 1122 उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे. ओवेसींच्या गडात पाय रोवण्यासाठी पहिल्यांदाच भाजपाने महापालिकेसारख्या छोट्या निवडणुकीत मोठी ताकद लावली होती. भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील प्रचारात आले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ देखील आले होते. टीआरएसच्या नेत्या कविता यांनी सांगितले की, आम्ही १०० हून अधिक जागा जिंकणार आहोत. भाजपाचे मोठमोठे नेते निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आले होते. त्यांनी मतदारांना खोटी आश्वासने दिली. मला आनंद आहे की हैदराबादच्या लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही व केसीआरच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. 


हैदराबादमध्ये १ डिसेंबरला मतदान झाले होते.  यावेळी 46.55 टक्केच मतदान नोंदविले गेले. सत्ताधारी टीआरएस सर्वच्या सर्व १५० जागांवर निवडणूक लढवत आहे. तर भाजपा १४९ जागांवर निवडणूक लढवत आहे. एमआयएम ५१ जागांवर निवडणूक लढवत आहे. 
२०१६ चा निकाल काय होता? 
हैदराबाद महानगरपालिका देशातील मोठ्या महापालिकांपैकी एक आहे. यामध्ये हैदराबाद, रंगारेड्डी, मेडचल-मल्काजगिरी आणि संगारेड्डी असे चार जिल्हे येतात. या पालिकाक्षेत्रात २४ विधानसभा आणि ५ लोकसभा मतदारसंघ आहेत. २०१६ मध्ये या पालिकेत टीआरएसला ९९, ओवेसींच्या एमआयएमला ४४ पैकी ५  आणि भापालाही ५ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या. 

Web Title: BJP's strong push in Hyderabad Municipal Corporation; Shake the fort of Owesi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.