BJP's fort shattered; Congress 'Abhijit Wanjari wins in Fadnavis' Balekilla | नागपूर: भाजपचा गड फोडला; फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयासमिप

नागपूर: भाजपचा गड फोडला; फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयासमिप

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत पाचही फेऱ्यांत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. नागपूर हा भाजपाचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. 


वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर होते. हीच आघाडी कायम राहिली आणि भाजपाच्या जोशी यांना मोठ्या मतफरकाने पराभव पत्करावा लागला. 


नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये आज झालेल्या मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर १ लक्ष ३३ हजार ५३ मतांची मोजणी पूर्ण झाली. तथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये  अपेक्षित असणारा ६० हजार ७४७चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. अभिजित गोविंदराव वंजारी एकूण मते ५५ हजार ९४७, संदीप जोशी एकूण मते ४१ हजार५४०, अतुल कुमार खोब्रागडे ८ हजार४९९, नितेश कराळे ६ हजार८८९ मते मिळाली. विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे या निवडणुकीतील मतमोजणीचा भाग क्रमांक २ सुरु करण्यात आला. 


यानुसार काँग्रेसने वंजारी यांना विजयी घोषित केले. सकाळी 9.30 ला ते विजयी प्रमाणपत्र घेण्यास मतदान केंद्रावर जाणार  आहेत. कोरोनामुळे फारशी अपेक्षा नसतानादेखील मतदारसंघातील सहाही जिल्ह्यात ६४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातूनदेखील जोरदार प्रतिसाद मिळाला. गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. 

Web Title: BJP's fort shattered; Congress 'Abhijit Wanjari wins in Fadnavis' Balekilla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.