BJP in trouble from West Bengal; ticket given to Rajya Sabha MP swapan Dasgupta | पश्चिम बंगालवरून भाजपा अडचणीत; राज्यसभा खासदारालाच दिले आमदारकीचे तिकिट

पश्चिम बंगालवरून भाजपा अडचणीत; राज्यसभा खासदारालाच दिले आमदारकीचे तिकिट

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक (West Bengal Election 2021) हाय व्होल्टेज होणार आहे. केंद्रात सत्ताधारी भाजपा (BJP) आणि राज्यातील सत्ताधारी तृमणूल (TMC) अशा दोन ताकदवान पक्षांमध्ये जोरदार टक्कर पहायला मिळत आहे. काँग्रेस, डावी आघाडी चर्चेपासून दूर असली तरीदेखील गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभेनुसार ही आघाडीच विरोधी पक्ष होती. या निवडणुकीत एका राज्यसभा खासदाराला तिकिट देऊन भाजपा मोठ्या पेचात सापडली आहे. (Rajya Sabha MP swapan Dasgupta candidate of BJP from Tarkeshwar constituency.)


भाजपाने राज्यसभेचे सदस्य आणि बंगालमधील मोठी हस्ती स्वपन दासगुप्ता यांनी हुगली जिल्ह्यातील तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून तिकिट दिले आहे. यास तृणमूलने विरोध केला असून राज्यसभेचे सदस्यत्व असताना कसे काय विधानसभा लढविता येईल असा आक्षेप घेतला आहे. 

आघाडीत उभी फूट! काँग्रेसविरोधात शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधली; ममतांसाठी प्रचार करणार


पश्चिम बंगालमध्ये 6 एप्रिलला होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी रविवारी भाजपाने 26 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये दासगुप्तांचे नावदेखील होते. यावर तृणमूल काँग्रेसने त्यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडण्याची तयारी केली आहे. यामुळे भाजपा अडचणीत आली आहे. 


दासगुप्ता हे राज्यसभेचे नामांकित सदस्य आहेत. भारतीय संविधानानुसार त्यांच्या प्रतिष्ठेचा हवाला देत तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्विट करून पहिल्यांदा यावर आक्षेप घेतला. राज्यघटनेच्या 10 व्या तरतुदीनुसार जर एखादा राज्यसभेचा नामांकित सदस्य शपथ घेतल्यानंतर आणि 6 महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर जर कोणत्याही राजकीय पक्षात जात असेल तर त्याचे राज्यसभा सदस्यपद अयोग्य घोषित केले जाईल. असे असताना दासगुप्ता यांना एप्रिल 2016 मध्ये शपथ देण्यात आली होती. आता त्यांना भाजपात जाण्यामुळे अयोग्य घोषित केले जायला हवे, असे मोईत्रा यांनी म्हटले आहे. 


दासगुप्ता यांनी अद्याप अर्ज भरलेला नाही. मात्र, त्यांनी उमेदवारीचे स्वागत केले आहे. तृणमूलने आज यावर राज्यसभेत प्रस्ताव देण्याची तयारी केली आहे. यामुळे असे झाल्यास राज्यघटनेनुसार दासगुप्ता यांना एकतर सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे किंवा राज्यसभाच त्यांना अयोग्य घोषित करण्याची शक्यता आहे. 

Web Title: BJP in trouble from West Bengal; ticket given to Rajya Sabha MP swapan Dasgupta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.