BJP does not allow Sushant Singh Rajput's soul to be saved, his death is used for political gain. -Sachin Sawant | "भाजप सुशांत सिंहच्या आत्म्याला मोक्ष मिळू देत नाही, त्याच्या मृत्यूचा राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग"

"भाजप सुशांत सिंहच्या आत्म्याला मोक्ष मिळू देत नाही, त्याच्या मृत्यूचा राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग"

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा भाजपाने राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग केला. भारतीय जनता पार्टीने अद्यापही त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही, अशी बोचरी टीका करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केली. याबाबत भारताची जनता भाजपाला माफ करणार नाही. सीबीआय आता चिडीचूप का आहे? याचं उत्तर द्या, असे आव्हानही सावंत यांनी यावेळी दिले.

सुशांत सिंह राजपूत याच्या जन्मदिनी सचिन सावंत यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सचिन सावंत म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत हा अत्यंत गुणी व होतकरू कलाकार होता. ज्या पद्धतीने त्याने या जगाचा निरोप घेतला ते अत्यंत दुर्देवाचे होते. परंतु भारतीय जनता पक्षाने मात्र त्याच्या मृत्यूकडे राजकीय संधी म्हणून त्याचा फायदा उचलला. महाराष्ट्राची बदनामी करून बिहार विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्याकरिता त्याचा उपयोग केला. या प्रकऱणात मुंबई पोलिसांसारख्या अत्यंत कर्तबगार संस्थेची बदनामी गुप्तेश्वर पांडेसारख्या व्यक्तीकडून करवली गेली.महाराष्ट्रातील नेत्यांना या प्रकरणात गोवून बदनाम करण्याचा प्रयत्नही भाजपकडून केला गेला. केंद्र सरकारच्या अखत्यारितील तीन तीन तपास यंत्रणा या प्रकरणात आणून तपासातील तपशील लीक करण्यात आले. सोशल मीडियावर लाखो बोगस फेसबुक आणि ट्वीटर अकांऊट उघडून सुशांत सिंहची हत्याच झाली आहे अशा वावड्या उठवण्यात आल्या. याकामी टीआरपी घोटाळ्याचा आरोप असलेल्या एका कुख्यात वाहिनीची मदतही घेण्यात आली. अद्यापही ईडी, सीबीआय आणि एनसीबी या तिन्ही तपास यंत्रणांच्या हाती काहीही लागले नाही. मुंबई पोलिसांचा तपास व्यावसायिक पद्धतीने व प्रामाणिकपणे चालला होता हे सर्वोच्च न्यायालयाचे मत योग्य होते हे आता स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अद्यापही सीबीआय का गप्प आहे? असा प्रश्न उपस्थित करून सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या हीन राजकारणाचा तीव्र निषेध केला.

Web Title: BJP does not allow Sushant Singh Rajput's soul to be saved, his death is used for political gain. -Sachin Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.