BJP Devendra Fadnavis Slams Thackeray Government Over budget session and sanjay rathod | "स्वत:च्या आमदार, मंत्र्यांची सरकारला भीती; उघडं पडण्याच्या भीतीनं सरकार पळ काढतंय"

"स्वत:च्या आमदार, मंत्र्यांची सरकारला भीती; उघडं पडण्याच्या भीतीनं सरकार पळ काढतंय"

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. याच दरम्यान भाजपा नेते आणि राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. विविध मुद्द्यांवरून फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून  पळ काढत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच "मंत्री 10 हजार लोकं जमवतात आणि अधिवेशनाला मात्र कोरोनाची भीती दाखवली जाते" असं म्हणत फडणवीसांनी सणसणीत टोला लगावला आहे. 

जनतेच्या प्रश्नावर सरकारला काही देणं घेणं नाही. बिझनेस अ‍ॅडव्हायझरी कमिटीवरुन वॉकआऊट करत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. संजय राठोड प्रकरणासह इतरही प्रकरणांमध्ये विरोधी पक्ष नेहमीच आक्रमक राहील असा इशाराही फडणवीसांनी सरकारला दिला आहे. अशा प्रकरणात उघडं पडण्याच्या भीतीने सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे. तसेच नियम फक्त विरोधकांनाच आहेत का?, सत्ताधाऱ्यांना नाहीत का? असा सवाल करत टीकास्त्र सोडलं आहे. राज्यात विविध प्रकारचे प्रश्न आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. जे अधिवेशनात मांडायचे आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

"मंत्री 10 हजार लोकं जमवतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोनाची भीती दाखवली जाते"

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोनामुळे पूर्ण अधिवेशन घेता येत नसेल तर आता लेखानुदान घ्या आणि परिस्थिती ठीक झाल्यानंतर पूर्ण अधिवेशन घ्या अशीही मागणी केली आहे. पण कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनासाठी तयार नाही. अधिवेशनापासून पळ काढणं हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झालं नाही. कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरू आहेत. मंत्री 10 हजार लोकं जमवतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोनाची भीती दाखवली जाते. तुमच्या मंत्र्यांना कुठलेच नियम नाहीत का? नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का? इथेच येताना भीती का वाटते? असा सवालही फडणवीसांनी  केला आहे. कोरोनाच्या नावाने पळ काढला जात आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. 

"जनतेच्या प्रश्नावर या सरकारला काहीही देणं घेणं नाही"

"विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेणं म्हणजे स्वत:च्या आमदारांना आणि मंत्र्यांना घाबरलं आहे. निवडणुकीत काही वेगळं चित्र निर्माण होईल का? अशी भीती सरकारला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीचा विषयच अजेंड्यावर आणला गेला नाही" असं फडणवीसांनी म्हटलं आहे. "जनतेच्या प्रश्नावर या सरकारला काहीही देणं घेणं नाही. अधिवेशनात जेवढा कालावधी मिळेल त्या कालावधीत सर्व आयुधांचा वापर करुन जनतेचे प्रश्न मांडू आणि सरकारला उत्तर द्यायला भाग पाडू" असं देखील म्हटलं आहे. सरकार अधिवेशनाचा कालावधी पहिला आठवडा, दुसऱ्या आठवड्यात बजेट आणि दोन दिवस चर्चा असा ठरल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. 

Web Title: BJP Devendra Fadnavis Slams Thackeray Government Over budget session and sanjay rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.