BJP corporator aggressive from presidential election | अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजप नगरसेवक आक्रमक

अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजप नगरसेवक आक्रमक

मुंबई :  महापालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी मत फिरवल्याने भाजपचे गणित फिस्कटले. त्यात एस/टी प्रभागात भाजप नगरसेविकेचे मत अवैध ठरवित शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. मागणी करूनही मतपत्रिकेवरील नगरसेविकेची स्वाक्षरी दाखविण्यात न आल्यामुळे भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच चिटणीसांच्या घराबाहेर आंदोलन केल्यानंतर सोमवारी भाजप नगरसेवकांनी पालिका मुख्यालयातील महापौर दालन व चिटणीस कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने केली.

महापालिकेतील १७ प्रभाग समित्यांपैकी १२ समित्यांवर शिवसेनेला वर्चस्व मिळवता आले आहे. तर पाच प्रभागांच्या अध्यक्षपदावर भाजपला समाधान मानावे लागले. यापैकी एस आणि टी या प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे १०, शिवसेनेचे ८, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सदस्य आहेत. त्यामुळे उभय पक्षांना समान मत असल्याने चिठ्ठीद्वारे अध्यक्षाची निवड होणार होती. मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे एक मत बाद ठरवत शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी घोषित केले.

हा प्रकार संशयास्पद वाटल्याने भाजप नगरसेवकांनी आपल्या नगरसेविकेच्या अवैध झालेल्या मताची पडताळणी करण्यासाठी मतपत्रिका दाखविण्याची मागणी केली. मात्र मतपत्रिका दाखविण्याऐवजी चिटणीस विभागातील कर्मचाऱ्यांनी ती घेऊन सभागृहातून पळ काढला. त्यामुळे आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यासाठी महापौरांनी ही खेळी केल्याचा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. या विरोधात भाजप नगरसेवकांनी महापौर दालनाबाहेर सोमवारी तीव्र निदर्शने करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पालिका चिटणीस यांना हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी घाट घातला. आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी करण्यासाठी महापौरांनी आपले पद पणाला लावले. मुंबई महापालिकेच्या इतिहासातील ही काळी घटना आहे.
    - प्रभाकर शिंदे, गटनेते, भाजप

महापौरांवर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. मुलाच्या कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट, वरळी एसआरए प्रकल्पातील आठ गाळे गिळंकृत केल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला आहे. मात्र महापौरांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे.
 

Web Title: BJP corporator aggressive from presidential election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.