बिहारमध्ये आम्ही 20 ते 22 जागा जिंकणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 19:21 IST2020-11-08T19:19:48+5:302020-11-08T19:21:09+5:30
Bihar Election Result 2020 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा शनिवारी संपला असून कोण जिंकणार, कोण हरणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

बिहारमध्ये आम्ही 20 ते 22 जागा जिंकणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
अकोला : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा शनिवारी संपला असून कोण जिंकणार, कोण हरणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. यातच काल एक्झिट पोल आलेले असताना महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. बिहारमध्ये त्यांची आघाडी 20 ते 22 जागा जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बिहार निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. त्यामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण होईल. प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक फ्रंटमुळे बिहारची निवडणूक विकासाच्या मुद्यावर आली, हे आमचे यश असून आम्ही २० ते २२ जागांवर यश मिळवू, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. अकोल्यामध्ये शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आळंदीच्या वैदिक आचार्यांच्या दबावामुळेच मंदिर बंद
राज्यभरातील वारकऱ्यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी करून वंचित बहुजन आघाडीला या आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. त्यानुसार पंढरपुरात आंदोलन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसात निर्णय देतो, असे जाहीर केले होते; मात्र आळंदीच्या वैदिक आचार्यांच्या दबावापुढे शासन झुकले. राज्यभरातील मंडळींना मंदिर खुले करण्याचे श्रेय जाईल, अशी भीती त्यांना वाटली. त्यामुळेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर दबाव टाकण्यात आला, असा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविलेले डॉ. यशपाल भिंगे आणि अनिरुध्द बनकर असे दोन उमेदवार राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिले. भिंगे, बनकर हे राजकीय प्रलोभनाला बळी पडले असून, या दोघांचेही राजकारण शॉर्ट टाइम टर्मचे आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला भाडोत्री नेत्यांचीच गरज पडते, असा टोला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हाणला आहे.