Bihar Election 2020: शरद पवारांचा विक्रम मोडण्यासाठी बिहारमध्ये तेजस्वी यादव सज्ज?
By प्रविण मरगळे | Updated: November 9, 2020 13:42 IST2020-11-09T13:39:38+5:302020-11-09T13:42:24+5:30
Tejashvi Yadav, RJD, BJP, Sharad Pawar, Youngest CM of State News: बहुतांश एक्झिट पोलनुसार तेजस्वी यादव यांच्याबाजूने बिहारच्या लोकांनी कौल दिला असून जर असं झालं तर मुख्यमंत्रिपदाची माळ तेजस्वी यादव यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.

Bihar Election 2020: शरद पवारांचा विक्रम मोडण्यासाठी बिहारमध्ये तेजस्वी यादव सज्ज?
पटणा – बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत भाजपा,जेडीयू महायुतीसमोर आरजेडी आणि काँग्रेस यांनी कडवं आव्हान उभं केलं होतं, एक्झिट पोलनुसार सध्या बिहारच्या निकालांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात काँग्रेस-आरजेडीला मोठं यश येणार असल्याचा जनतेचा कल दिसून येत आहे.
बहुतांश एक्झिट पोलनुसार तेजस्वी यादव यांच्याबाजूने बिहारच्या लोकांनी कौल दिला असून जर असं झालं तर पुढील मुख्यमंत्रिपदाची माळ तेजस्वी यादव यांच्या गळ्यात पडेल. आणि वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी तेजस्वी यांच्यासाठी ते सर्वात मोठं गिफ्ट असेल. आज तेजस्वी यादव यांचा वाढदिवस आहे तर उद्या(मंगळवारी) बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होणार आहे. या निकालात तेजस्वी यादव हे आणखी एक विक्रम साध्य करू शकतात.
बिहारमध्ये सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांना सन्मान मिळू शकतो. यापूर्वी सतीश प्रसाद सिंह हे वयाच्या ३२ व्या वर्षी १९६८ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री राहिले होते. तेजस्वी यादव हे ३१ वर्षांचे आहेत. १ जानेवारी १९३६ मध्ये जन्म घेतलेल्या सतीश प्रसाद यांचा कार्यकाळ अवघ्या ५ दिवसांचा होता. एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर तेजस्वी यादव बिहारमधील सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री होतील पण त्यासाठी मंगळवारच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे. शरद पवार हे वयाच्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते.
जर तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर ते नवा विक्रम रचू शकतात. वास्तविक पौड्डेंचरीचे एमओएच फारूक हे वयाच्या २९ व्या वर्षी मुख्यमंत्री बनले आहेत, परंतु पौड्डेंचरीला राज्याचा दर्जा नाही, तो केंद्रशासित प्रदेश आहे. बिहारच्या निवडणुकीत रोजगार आणि नोकरीचा मुद्दा बनवून तेजस्वी यादव यांनी छाप पाडली. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा तेजस्वी यादव यांनी यशस्वीरित्या सांभाळली होती.
दरम्यान, एक्झिट पोलनी तेजस्वी यादव यांच्या राजद आघाडीला बहुमताचे संकेत दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यामुळे कोरोना संकटात लढल्या गेलेल्या या निवडणुकीत विजयाचा जल्लोषही मोठ्या प्रमाणावर साजरा होण्याची शक्यता आहे. यावर तेजस्वी यादव यांनी नेत्यांना महत्वाची सूचना जारी केली आहे. राजदच्या उमेदवारांनी विजयी झाल्यानंतर विजयाची रॅली किंवा जल्लोष साजरा करू नये. विजयाचा उत्सव जनता साजरा करेल. मतमोजणीवेळी उमेदवारांनी त्यांच्याच मतदार संघात राहावे आणि विजयी झालेल्यांनी त्यांना मिळालेले सर्टिफिकेट घेऊनच पटण्याकडे कूच करावे, असे आदेश दिले आहेत.
असा आहे एक्झिट पोलचा अंदाज
रिपब्लिक भारत
रिपब्लिक भारत आणि जन की बातने केलेल्या एक्झिट पोलनुसार पासवान यांनी जदयूला 25 जागांवर नुकसान पोहोचविले आहे. एनडीएला 37-39 टक्के मतदान, महाआघाडीला 40-43 टक्के, एलजेपीला 7-9 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर एनडीएला 91-117 जागा, महाआघाडीला 118- 138 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एलजेपीला 5-8 जागा मिळणार असल्याचे म्हटले आहे.
२) एबीपी न्यूज- सीवोटर सर्व्हे
एबीपी न्यूज आणि सीव्होटर सर्व्हेमध्ये एनडीएला 104 ते 128 जागा, तेजस्वी यादवा यांच्या महाआघाडीला 108 ते 131 जागा, पासवान यांच्या एलजेपीला 1-3 आणि इतरांना 4-8 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
३) टाइम्स नाउ-C Voter
बिहार विधनसभा निवडणुकीत टाइम्स नाउ- C Voter यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये नितिश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए आणि राजदच्या नेतृत्वातील महाआघाडीमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळणार आहे. सर्व्हेमध्ये एनडीएला 116 जागा आणि महाआघाडीला 120 जागा देण्यात आल्या आहेत. एलजेपीला 1 जागा आणि अन्य 6 जागा.
४) Today's Chanakya
टुडेज चानक्य यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये 63 टक्के लोकांना यंदा सत्ताबदल हवा आहे. 35 टक्के लोकांनी बेरोजगारी महत्वाचा मुद्दा म्हटले आहे. 19 टक्के लोकांना भ्रष्टाचार महत्वाचा मुद्दा वाटला, तर 34 टक्के लोकांना अन्य मुद्दे महत्वाचे वाटले आहेत.