After pratap sarnaik one more shiv sena leader on EDs radar | सरनाईकांपाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या रडारवर? 

सरनाईकांपाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या रडारवर? 

मुंबई: आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर असल्याचं वृत्त आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात या नेत्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी होणार असल्याचं कळतंय. 'एबीपी माझा'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

टॉप्स एजन्सी प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर गेल्या आठवड्यात ईडीनं धाडी टाकल्या. त्यांचे पुत्र विहंग यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीदेखील केली. त्यानंतर आतापर्यंत ईडीनं आतापर्यंत तीनवेळा विहंग यांना समन्स बजावलं आहे. मात्र ते चौकशीसाठी उपस्थित राहिलेले नाहीत, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणात प्रताप सरनाईक यांचीदेखील चौकशी होणार आहे. मात्र परदेशातून आल्यानं ते सध्या क्वारंटाईन आहेत.

प्रताप सरनाईकांच्या अडचणी वाढल्या; टॉप्स ग्रुपच्या गैरव्यवहारातील नफ्यात ५०%  वाटा? 

यानंतर आता शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या रडारवर असल्याचं समजतं. या नेत्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची ईडीकडून मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात चौकशी होऊ शकते. अशी चौकशी झाल्यास शिवसेनेच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील सरकार आता ईडीला रोखण्याच्या तयारीत असल्याचं कळतं. सीबीआयला राज्यात येण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता असते. तशाच प्रकारे ईडीलादेखील राज्यात येऊन तपास, चौकशी करण्यासाठी परवानगी घेणं सक्तीचं करू शकतो का, याची चाचपणी सध्या सरकारकडून सुरू आहे.

संजय राऊतांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा; भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

ईडी, सीबीआयला सीमेवर पाठवा- संजय राऊत
केंद्र सरकार विरोधकांना गप्प बसवण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ईडी, सीबीआयचा वापर शत्रूला जेरीस आणण्यासाठी केला जातो. त्यामुळे ईडी, सीबीआयला केंद्रानं पाकिस्तान, चीनच्या सीमेवर पाठवायला हवं. त्यामुळे आपले शत्रू नामोहरम होतील, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला. तुम्हाला ईडीची नोटीस आली का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर अद्याप तरी नोटीस आलेली नाही. मी वाट बघतोय, असं उत्तर राऊत यांनी दिलं. सध्या ईडी, सीबीआयकडून उत्खननाचं काम सुरू आहे. ते हडप्पा, मोहंजोदडोपर्यंत पोहोचले आहेत, असा चिमटादेखील त्यांनी काढला.
 

Web Title: After pratap sarnaik one more shiv sena leader on EDs radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.