Zilla Parishad Election : दोन्ही राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी यांच्यात चुरशीची लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:53 IST2026-02-04T13:52:35+5:302026-02-04T13:53:49+5:30
- आठ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकांकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

Zilla Parishad Election : दोन्ही राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी यांच्यात चुरशीची लढत
सुदेश गिरमे
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असून, दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजप–शिवसेना युती, उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आठ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकांकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गण असून, या सर्व ठिकाणी प्रमुख पक्षांनी ताकद लावली आहे. गतवेळी पंचायत समितीवर भाजपची सत्ता होती. यंदा शिवसेनेसह युती करून भाजपने सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न सुरू केला असून, २५ वर्षांनंतर पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक रणनीती आखली आहे.
जिल्हा परिषदेत दुरंगी, तिरंगी व चौरंगी लढती
इंदोरी–वराळे, खडकाळा–कार्ला आणि सोमाटणे–चांदखेड गटांत राष्ट्रवादी व भाजप यांच्यात थेट दुरंगी लढत होत आहे. टाकवे बुद्रुक–नाणे गटात तिरंगी, तर कुसगाव बुद्रुक गटात चौरंगी लढत होत असल्याने निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.
पंचायत समिती गणांमध्येही चुरस
वराळे, काले व चांदखेड गणांमध्ये दुरंगी, तर टाकवे बुद्रुक, नाणे, इंदोरी, खडकाळा, कार्ला, कुसगाव बुद्रुक आणि सोमाटणे गणांमध्ये तिरंगी लढती होत आहेत. प्रत्येक गणात अपक्ष उमेदवारांची भूमिका निकालावर परिणाम करणारी ठरण्याची शक्यता आहे.
मतदारसंख्या व निवडणूक आकडेवारी
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण २ लाखांहून अधिक मतदार आहेत. यामध्ये पुरुष व महिला मतदारांची संख्या जवळपास समान असून, तृतीयपंथी मतदारांचाही समावेश आहे. जिल्हा परिषदेसाठी १३, तर पंचायत समितीसाठी २७ उमेदवार रिंगणात आहेत.
प्रचारात बदल, थेट संपर्कावर भर
यंदा प्रचाराच्या पद्धतीत लक्षणीय बदल दिसून येत आहे. ढोल-ताशे, फटाके, मोठ्या सभा टाळून उमेदवार घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. सोशल मीडियाचा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असून, व्हॉट्सॲप व फेसबुकसारखी माध्यमे प्रभावी ठरत आहेत.
शेवटच्या टप्प्यात राजकीय हालचालींना वेग
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. प्रभावी स्थानिक नेते, संस्थाध्यक्ष, महिला बचत गट आणि युवक संघटनांशी स्वतंत्र बैठका घेतल्या जात असून, संभाव्य मतांचे गणित जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी सामंजस्य व रणनीतीपूर्ण राजकीय हालचालींचीही चर्चा आहे.